सांगली : प्रतिनिधी
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्काराचे वितरण ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गौरव पदक, ३० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी सांगितले.
सई परांजपे यांनी बालनाट्य, प्रौढ नाटके, नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अनुवाद अशा विविध क्षेत्रांत योगदान दिले आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा ‘मुलांचा मेवा’ हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. आई शकुंतला परांजपे आणि आजोबा रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या प्रोत्साहनातून त्यांच्या कलात्मक प्रवासाला दिशा मिळाली.
परांजपे यांनी मुलांसाठी नऊ नाटके लिहिली. ‘पक्ष्यांचे कवीसंमेलन’, ‘पत्ते नगरीत’, ‘झाली काय गंमत’, ‘जादूचा शंख’ आणि ‘शेपटीचा शाप’ ही त्यांपैकी काही नाटके. ‘झाली काय गंमत’ आणि ‘शेपटीचा शाप’ या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकांचे पुरस्कार मिळाले. त्यांची बालनाटके आजही शालेय स्तरावर सादर केली जातात.
















