पुणे : ‘कर्जमाफी कधी करायची याचे काही नियम आहेत, काही एक पद्धती आहे. हा निर्णयही सरकार उचित वेळी घेईल. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरविणार नाही,’ अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त ‘वारकरी भक्तीयोग’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कर्जमाफीच्या मुद्याबाबत विचारले असतामुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
धरण अभियंत्यांना दक्षतेचे आदेश
धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांतून होत असलेला विसर्ग आणि पुराच्या धोक्याकडे लक्ष वेधले असता, ‘धरणांवर नेमण्यात आलेल्या अभियंते आणि अधिका-यांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठातील प्राध्यापक भरती लवकरच
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत भरारी घेतली आहे. विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक परवानग्या देण्यात आल्या आहेत. लवकरच विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिकेचे नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’चे विश्वस्त राजेश पांडे, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर या वेळी उपस्थित होते.