लातूर : प्रतिनिधी
‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या संतवचनाची प्रचिती पुन्हा एकदा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आली आहे. माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी गळीत हंगाम २०२५-२६ साठी जाहीर केलेल्या ऊसदरापेक्षाही अधिक दर देत शेतक-यांशी असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे. गाळपास आलेल्या उसाला कारखान्याकडून प्रतिमेट्रिक टन ३,१७७.६२ रुपये दराने अंतिम ऊसबिल ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची परंपरा जपणारे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सहकारी साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून नेहमीच शेतक-यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याच भूमिकेचा प्रत्यय पुन्हा एकदा ऊसबिलाच्या माध्यमातून आल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यातीलच नव्हे तर देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांनी प्रतिमेट्रिक टन किमान ३,१५० रुपये ऊसदर जाहीर केला होता. मात्र अंतिम हिशोबानुसार शेतक-यांना प्रतिमेट्रिक टन ३,१७७.६२ रुपये इतका दर देण्यात आला असून जाहीर केलेल्या दरापेक्षाही अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे.
गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर एकूण २२७ कोटी ३२ लाख ९७ हजार ९४६ रुपये इतकी रक्कम वर्ग केली आहे. त्यामुळे ऊस पुरवठादार शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कारखान्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. कारखान्याने यापूर्वी प्रतिमेट्रिक टन २,८५० रुपये प्रमाणे ऊसबिल अदा केले होते. उर्वरित एफआरपीपैकी प्रतिमेट्रिक टन ३२७.६२ रुपये अंतिम ऊसबिल म्हणून दि. १० जून २०२६ रोजी ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली. संबंधित रक्कम खात्यात जमा झाल्याबाबत खात्री करण्यासाठी ऊस पुरवठादारांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही व्यवस्थापनाने केले आहे.
दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मोरे यांनी दिलीपराव देशमुख यांचे आभार मानले आहेत. ‘जैसे बोले तैसे चाले, त्याची वंदावी पावले’ या उक्तीप्रमाणे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या हिताला प्राधान्य देत त्यांनी नेहमीच निर्णय घेतले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतक-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, हा ऊसदर त्याच शेतकरीहिताच्या भूमिकेचा भाग असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा देणारा हा निर्णय सहकार क्षेत्रातील आदर्श पाऊल मानला जात असून, मांजरा परिवाराने पुन्हा एकदा शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विश्वासाची परंपरा कायम राखल्याची प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कार्याध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, प्रज्योत हुडे यांच्यासह शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
















