आयपीएलमध्ये विराट विक्रम, ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएल २०२६ च्या ३९ व्या सामन्यात सोमवारी क्रिकेट चाहत्यांना एक थरारक आणि ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. दिल्लीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीचे अक्षरश: कंबरडे मोडले. आरसीबीने दिल्लीला अवघ्या ७५ धावांत रोखून या हंगामातील सर्वात निचांकी धावसंख्येची नोंद केली. अनुभवी विराट कोहली आणि युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल यांनी कोणतीही घाई न करता संयमी फलंदाजी केली. दिल्लीच्या गोलंदाजांना एकही संधी न देता या जोडीने आरसीबीला ९ विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवून दिला.
दरम्यान, विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्स विरोधात ११ धावा करत ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला. विराटने या धावा २७५ मॅचमध्ये २६७ डावात पूर्ण केल्या. विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्स विरोधात १५ बॉलमध्ये एक चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २३ धावा केल्या. कमी धावसंख्येच्या या सामन्यात विजय मिळवल्याने बंगळुरु गुणतालिकेत दुस-या स्थानावर पोहोचली. आरसीबीने आयपीएलमध्ये ८ पैकी ६ सामन्यांत विजय मिळवल्याने त्यांच्याकडे गुणतालिकेत १२ गुण आहेत. विराट कोहली सर्वाधिक धावा करणा-या खेळाडूंच्या यादीत टॉप फाईव्हमध्ये आहे. विराट कोहलीने ८ सामन्यांत ३५१ धावा केल्या आहेत.

