जळगाव : प्रतिनिधी
महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिवाळीच्या काळात किंवा दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिला होता आणि आता त्याची वेळ आली असल्याचे कडू यांनी म्हटले.
जळगाव दौ-यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले. दिवाळीच्या काळात किंवा दिवाळी संपताच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि मोठा फेरबदल होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तावाटपाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिला होता, आता ती वेळ आली आहे, असा दावा त्यांनी केला.
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणीही कडू यांनी केली. पाटील हे सलग तीन वेळा आमदार झाले असून, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचे कडू म्हणाले.
















