जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम आता ग्रामीण भागातील जनजीवनावर होऊ लागला असून, दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणेही अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना, जळकोट तालुक्याची जीवनवाहिनी मानली जाणारी तिरू नदी दिवाळीपूर्वीच कोरडी पडल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. जळकोट तालुक्यात वाडी तांड्याची संख्या अधिक आहे. या ठिकाणी शाळा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या शाळेमध्ये येणा-या काळात विद्यार्थ्यांसाठी पाणी उपलब्ध होईल का असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. विहिरी, हातपंप आणि विद्युत पंपांच्या पाणीपातळीत घट होत असल्याने गावोगावी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. याचा परिणाम शाळांमधील पाणीपुरवठ्यावरही होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचे आव्हान शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनासमोर उभे राहू शकते. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मिळाले नाही तर त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि शैक्षणिक दिनक्रमावर होण्याची भीती आहे. त्यामुळे शाळांमधील पाणीपुरवठ्याची आतापासूनच व्यवस्था करणे आवश्यक बनले आहे.
जळकोट तालुक्यातील तिरू नदी परिसरातील अनेक गावांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण आणि त्यानंतरच्या पावसातील खंडामुळे नदीतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. दिवाळीपूर्वीच तिरू नदी कोरडी पडल्याने यंदाच्या दुष्काळाची तीव्रता स्पष्ट होत आहे. सामान्यत: पावसाळ्यानंतर काही काळ नदीपात्रात पाणी टिकून राहते मात्र, यंदा दिवाळीपूर्वीच नदीपात्र कोरडे पडल्याने आगामी काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नदीतील पाणी आटल्याचा परिणाम परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरही होण्याची भीती आहे. एकीकडे शेतक-यांवर दुष्काळाचे संकट तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तिरू नदी दिवाळीपूर्वीच कोरडी पडल्याने जळकोट तालुक्यातील पाणीटंचाईची गंभीरता अधोरेखित झाली असून आता प्रशासन कोणत्या उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
















