16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeलातूरदिव्यांगांच्या सांस्कृतिक स्पर्धेने प्रेक्षकांची मने जिंकली 

दिव्यांगांच्या सांस्कृतिक स्पर्धेने प्रेक्षकांची मने जिंकली 

लातूर : प्रतिनिधी
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद, लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व दिव्यांगांच्या विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील रुक्मिणी मंगल कार्यालय येथे आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. दिव्यांगांच्या सांस्कृतिक स्पर्धेने प्रेक्षकांची मने जिंकली.
या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादवराव गायकवाड, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिक्षक मधुकर वाघमारे यांची उपस्थिती होती. जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्यातील ५७ दिव्यांगांच्या शाळांतील ३३५  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झालेच, याशिवाय दिव्यांगांच्या उत्कृष्ट कलाकृतीने मान्यवरांनाही मोहित केले. यात समुहनृत्य गायन, मुकनाट्य, वैयक्तिक नृत्य, लावणी, देशभक्तीपर गीत यांचा समावेश होता.
दिव्यांगत्व टाळण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. शीघ्र निदान व उपचारामुळे दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बालकांमधील दिव्यांगत्वाचे निदान करून त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अंगणवाडीस्तरावर यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सांगितले.
दिव्यांगत्वाला शारिरीक व्याधी न समजता सामाजिक दायित्व समजून दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे.  तसेच दिव्यांगत्व टाळण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून  दिव्यांगांनाही विविध संकेतस्थळांवर माहिती व लाभ ही मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० विशेष शिक्षकांना सामावून घेण्यात आले आहे. आता त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा मानस आहे, असे मीना म्हणाले. प्रास्ताविकात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नाईकवाडी यांनी यंदाच्या वर्षात विविध उपक्रम राबवून ३ ते ९ डिसेंबर दरम्यान दिव्यांग सप्ताह साजरा होणार असल्याचे सांगून  जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सहाय्याने ट्रायसिकल व विविध दिव्यांगांना उपयुक्त साहित्य ही वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन बंकट पवार, व्यंकट लामजने, सिंधू इंगळे यांनी केले, तर डॉ. राजु गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR