लातूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सव सुरु आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यासह परजिल्हा व राज्यातील भाविक व नागरिक मोेठ्या संख्येने सहभागी होत आहेत. दिव्यांनाही या यात्रेचा आनंद घेता यावा यासाठी देवस्थानच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती. लातूर येथील जीवन विकास प्रतिष्ठान संचलित सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींच्या मुकबधीर विद्यालयाच्या १४८ विद्यार्थ्यांना विनाशुल्क यात्रा महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला आहे. यात्रेतील विविध खेळांचा आनंद घेतल्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील आनंदाचे भाव देवस्थानचे प्रशासक व विश्वस्थांसाठी समाधान देणारा ठरला.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री सिद्धेवर देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यातआले आहे. दि. २ मार्चपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम दररोज पार पडत आहेत. त्याच बरोबर यात्रा महोत्सवातील विविध खेळांचा आणि आकर्षक पाळण्यांचा आनंद घेण्यासाठी लातूर जिल्ह्यासह परजिल्हा व राज्यातील अनेक भाविक व नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यात्रेचा आनंद लुटता यावा याकरिता देवस्थानने सर्व सोयी व सुविधा उपलब्ध केलेल्याच आहेत. मात्र दिव्यांगानाही या यात्रा महोत्सवाचा आनंद लुटता यावा याकरिता देवस्थानचे प्रशासक व विश्वस्तांनी विशेष प्राधान्य दिलेले आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, अशोक भोसले, सुरेश गोजमगुंडे, रमेश बिसेन, विशाल झांबरे, ओम गोपे, महादेव खंडागळे, सिद्धेश्वर उकिरडे यांनी पुढाकार घेतला होता.
१४८ दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला मेळाव्याचा आनंद
लातूर येथील जीवन विकास प्रतिष्ठान संचलित सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींच्या मुकबधीर विद्यालयातील १४८ विद्यार्थ्यांना यात्रा महोत्सवासह आनंद मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी विनाशुल्क सोय उपलब्ध करून दिली होती. सर्वप्रथम या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्री सिध्देश्वराची महाआरती करण्यात आली. यानंतर देवस्थानच्या वतीने नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांसोबत या दिव्यांग विद्यार्थ्यांनी यात्रेचा आनंद लुटण्यास सुरुवात केली. यात्रेतील विविध खेळ व आकर्षक पाळण्यांमध्ये बसत या विद्यार्थ्यांनी मनमुराद मौजमजाही केली. यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाची सोयही देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती.

