लातूर : प्रतिनिधी
येथील गुरुवर्य पं. शांताराम चिगरी गुरुजी यांनी स्थापित केलेल्या सूरताल संगीत महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सूरताल संगीत सभे’चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या संगीत सभेचे उद्घाटन लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. संगीत सभेत दीपिका गित्ते-डिगोळे यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक इसरार सगरे, ओमप्रकाश झुरुळे, बालाजी पिंपळे, माजी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, ह.भ.प. माधव महाराज चौधरी, उमेश गिरवलकर आणि सोमनाथ गित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोनू डगवाले यांनी प्रास्ताविकातून सूरताल संगीत महाविद्यालयाच्या ५० वर्षांच्या सांगीतिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत गुरुजींच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर मुख्य सांगीतिक मैफिलीला सुरुवात झाली.
या विशेष संगीत सभेत पं. शांताराम चिगरी गुरुजी यांच्या शिष्या आणि सुप्रसिद्ध गायिका दीपिका गित्ते-डिगोळे यांच्या बहारदार शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दीपिका डिगोळे यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग मारू बिहागमधील विलंबित एकतालातील ‘बनरा मोरा आयो’ या बड्या ख्यालाने केली. अत्यंत संथ, शास्त्रशुद्ध आणि भारदस्त लयीत त्यांनी रागाची मांडणी करत मैफिलीत रंग भरला. त्यानंतर याच रागातील द्रुत लयीतील ‘मोरे नैनवा’ हा छोटा ख्याल सादर करून त्यांनी आपल्या कसलेल्या गायकीचे दर्शन घडवले. रागदारीनंतर त्यांनी सादर केलेल्या ‘आज बिरज में’ या प्रसिद्ध कजरीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. बालगंधर्वांच्या परंपरेतील ‘मी अधना’ हे नाट्यगीत अत्यंत तन्मयतेने सादर केले. पाठोपाठ मराठी सुगम संगीतातील अजरामर भावगीत ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ सादर करून त्यांनी संपूर्ण सभागृहाला भावूक केले.
मैफिलीच्या उत्तरार्धात त्यांनी विठ्ठलभक्तीचा जागर करत ‘बोलावा विठ्ठल’, ‘पंढरीच्या वाटेवर’ आणि ‘चंद्र तेथे चंद्रिका’ या भक्तिगीतांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. कार्यक्रमाची सांगता संत चोखामेळा यांच्या ‘अवघा रंग एक झाला’ या भैरवीने झाली. भैरवीच्या दिव्य स्वरांनी संपूर्ण सभागृह विठ्ठलमय झाले. या मैफिलीला हार्मोनियमवर गणेश सुतार, तबल्यावर तेजस धुमाळ यांनी उत्कृष्ट ठेक्याने साथसंगत केली. तर तानपुरा वर पूजा दहिफळे यांनी साथ केली. सुरताल संगीत सभेचे परमेश्वर पाटील यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप जगदाळे, रमेश शिंदे, राहुल कांबळे, व्यंकट काळे, हरीश कुलकर्णी, बालाजी चौधरी, महेश काकनाळे, गौरव साठे आणि शिवाजी कंदगुळे यांनी अथक परिश्रम घेतले. या ऐतिहासिक संगीत सभेला लातूर शहर व परिसरातील संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















