22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeलातूरदीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव मिळणार

दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव मिळणार

लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसला. अनेक शेतक-यांचे पीक पुरात वाहून गेले, तर काही ठिकाणी उत्पादनात लक्षणीय घट झाली. असे असतानाही बाजारभावात अपेक्षित वाढ होत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र, शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दराने पाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनमध्ये मोठया प्रमाणावर ओलावा आणि डॅमेज दिसून आले. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर दर्जा निकष पूर्ण न झाल्याने अनेक शेतक-यांचे सोयाबीन नाकारण्यात आले. परिणामी शेतक-यांना नाईलाजाने खुल्या बाजारात कमी दराने माल विकावा लागला. यामुळे प्रतिक्व्टिल ७०० ते १ हजार रुपयांपर्यंत आर्थिक फटका शेतक-यांना सहन करावा लागला.
 हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीनचे दर सातत्याने ४ हजार ५०० रुपयांच्या आसपासच रेंगाळत होते. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे खर्चही निघेनासा झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतक-यांनी आपला सोयाबीनचा माल साठवून ठेवण्यालाच प्राधान्य दिले होते. गेल्या काही दिवसांपासून बाजारातील सोयाबीनची आवक मंदावली आहे. मालाची उपलब्धता कमी झाल्याचा थेट परिणाम आता दरावर दिसून येऊ लागला आहे. शुक्रवारी लातूर बाजार समितीत झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारात सोयाबीनला कमाल ५ हजार १०० रुपये प्रतिक्व्टिल, तर सर्वसाधारण दर ४ हजार ८०० रुपये इतका मिळाला. ब-याच दिवसांनंतर झालेली ही दरवाढ शेतक-यांसाठी सुखावणारी ठरली आहे.
शुक्रवारी लातूर बाजार समितीत तब्बल १५ हजार ४३१ क्व्टिंल सोयाबीनची आवक झाली. दर वाढल्याने आवक वाढल्याचे चित्र दिसून आले. चालू आठवड्यात मात्र आवक सरासरी ८ हजार क्व्टिंलच्या आसपास होती आणि सर्वसाधारण दर प्रतिक्व्टिंल ४ हजार ८०० रुपयांच्या आत-बाहेर होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR