वाहन विक्रीवेळीच द्यावे लागणार २ हेल्मेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दुचाकी वाहनासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. येणा-या दोन हेल्मटची सक्ती होणार आहे. लवकरच दुचाकी वाहन उत्पादकांना वाहन विक्री वेळी खरेदीदारांना दोन हेल्मेट देणे अनिवार्य करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि तरुणांनी हेल्मट घालावे, यासाठी जागरुकता आणण्यात येणार आहे.
दोन हेल्मेट जर मिळणार असतील तर दुचाकीस्वार आणि त्याच्या मागील प्रवाशालासुद्धा हेल्मेट घालणे सक्तीचे होणार हे नक्की आहे. याविषयीची अधिसूचना येऊन धडकली आहे. केंद्र सरकारने दुचाकी वाहन निर्मिता करणा-या कंपन्यांसाठी नवीन अधिसूचना लागू केली आहे. दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट देणे अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन नियमांसाठी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत. अंतिम अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्यातच नवीन नियम अनिवार्य होतील. त्यानंतर रस्त्यावर दुचाकी चालक आणि दुचाकी स्वार यांनाही हेल्मेट वापरणे सक्तीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
१ जानेवारीपासून नवीन नियम?
देशात १ जानेवारी २०२६ पासून नवीन एल-२ श्रेणीतील दुचाकी वाहने, ज्यामध्ये ५० सीसी हून अधिक इंजिन क्षमता वा ५० किमी/प्रति तासाहून अधिक गती असलेल्या मोटरसायकल आणि स्कूटरला आता अँट-लॉक ब्रेकिंग सिस्टीम एबीएस लावावे लागेल. त्यामुळे अपघातातून मोठे नुकसान होणार नाही. या नियमांना अंतिम रूप देण्यापूर्वी परिवहन मंत्रालयाने देशभरातून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.