23.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeसंपादकीयदुर्मिळ यशाची खुमारी!

दुर्मिळ यशाची खुमारी!

यश मिळविण्यासाठी माणूस जंगजंग पछाडत असतो. अगदी ओठापर्यंत आलेला घास हिरावला जातो तेव्हा तो निराश होणे साहजिक आहे. अशावेळी त्याला यश हे पा-यासारखे आहे असे वाटत असते. अनेकवेळा अंतिम रेषेपर्यंत मजल मारूनही अंतिम रेषा ओलांडणे जमत नाही तेव्हा ‘चोकर्स’चा शिक्का बसतो. चोकर्स म्हणजे ऐनवेळी हातपाय गाळणे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने हा अनुभव अनेकवेळा घेतला आहे. सुमारे तीन दशके ‘चोकर्स’ची नामुष्की सहन केली आहे. परंतु अखेर शनिवार, १४ जून रोजी क्रिकेटची मक्का मानल्या जाणा-या लॉर्डस्च्या मैदानावर टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकेच्या संघावर दैव मेहरबान झाले. आतापर्यंत अनेक वेळा जगज्जेतेपदाने हुलकावणी दिल्यामुळे द. आफ्रिकेच्या संघावर ‘चोकर्स’चा शिक्का बसला होता. महत्त्वाच्या क्षणी नांगी टाकत त्यांनी त्याला खतपाणीही घातले होते. पण शनिवारचा दिवस द. आफ्रिकेसाठी संस्मरणीय ठरला. ऑस्ट्रेलियाला पाच विकेटस् राखून पाणी पाजत द. आफ्रिकेने आयसीसी कसोटी जगज्जेतेपद पटकावले अन् ‘चोकर्स’चा शिक्काही पुसून टाकला.

२७ वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद पटकावण्याची करामत बवुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकेच्या संघाने केली. मिचेल स्टार्कच्या ८४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कायले वेराननने कव्हर्सच्या दिशेने फटका लगावला आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंसह लॉर्डस्वर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारतातही क्रिकेट रसिकांनी आनंदोत्सव केला. अखेर बवुमाच्या संघाने आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. द. आफ्रिकेने अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा ५ गडी राखून पराभव केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५ चे जेतेपद मिळवल्याबद्दल आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी मानाची गदा (टेस्ट मेसा) द. आफ्रिकेच्या संघाला बहाल केली. लॉर्डस्वर रंगलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले २८२ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने चौथ्या दिवशीच पहिल्या सत्रात पार केले. आफ्रिकेने या जेतेपदासह अनेक वर्षांपासून मागे लागलेला ‘चोकर्स’चा (ऐनवेळी कच खाणारा संघ)शिक्का पुसून टाकला आणि जणूकाही ‘हम भी कुछ कम नही’चा इशारा क्रिकेटविश्वाला दिला. आफ्रिकेचे हे दुसरे आयसीसी जेतेपद. याआधी त्यांनी १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर बहुतांश आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांना उपान्त्य अथवा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आयसीसीने २०१९ पासून कसोटीसाठीही जागतिक स्पर्धा सुरू केली. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही स्पर्धा खेळवण्यात येते.

यामध्ये प्रत्येक संघ घरच्या मैदानात ३ तर परदेशात ३ कसोटी मालिका खेळतो. साखळी फेरीच्या अखेरीस टक्केवारीनुसार गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकाचे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. भारताने दोन वेळा अंतिम फेरीत धडक मारली होती परंतु दोन्ही वेळा भारताच्या पदरी निराशा पडली होती. यंदा अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका संघात लढत होती. अंतिम सामन्यात कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ २१२ धावांत गारद झाला. स्मिथच्या अर्धशतकामुळे कांगारूंना द्विशतकी मजल मारता आली. रबाडाने ५ बळी घेत कांगारूंची घसरगुंडी उडवली. त्यानंतर कांगारूंनी जशास तसे उत्तर देत द. आफ्रिकेला १३८ धावांत गुंडाळले. कर्णधार कमिन्सने भेदक मारा करताना ६ बळी घेतले. कांगारूंना पहिल्या डावावर ७४ धावांची घसघशीत आघाडी मिळाली. दुस-या डावात रबाडा व एन्गिडीने ऑस्ट्रेलियाची त्रेधातिरपीट उडवताना ७ बाद ७३ अशी दारुण स्थिती केली. परंतु वेगवान गोलंदाज स्टार्कचे अर्धशतक आणि त्याला कॅरीने समर्थ साथ दिल्याने कांगारूंना २०७ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे द. आफ्रिकेला चौथ्या डावात विजयासाठी २८२ धावांचे आव्हान मिळाले. कमिन्स, हेझलवूड आणि स्टार्क या वेगवान मा-यासमोर हे लक्ष्य सोपे नव्हते. परंतु आफ्रिकेने सकारात्मक सुरुवात करताना एकेरी-दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला.

द. आफ्रिकेच्या डावात मार्करम-बवुमाची शतकी भागीदारी निर्णायक ठरली. पहिल्या डावात भोपळाही फोडता न आलेला मार्करम पाय रोवून उभा राहिला. त्याने आपले आठवे शतक ठोकले. स्नायूदुखीचा त्रास झालेल्या बवुमाने जिद्दीने खेळ करत अर्धशतकी योगदान दिले. या जोडीने १४७ धावांची भागीदारी केली. त्यामुळेच आफ्रिकेचा विजय शक्य झाला. मार्करमचे शतक त्याच्या कारकीर्दीतील मौल्यवान शतक ठरले. या शतकामुळेच द. आफ्रिकेला स्वप्नवत विजय मिळाला. कांगारूंच्या दुस-या डावात त्याने स्मिथचा अडसर दूर केला होता. त्यालाच ‘सामनावीर’चा मान मिळाला. बवुमा हा द. आफ्रिकेसाठी ‘लकी’ कर्णधार ठरला. आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने एकही कसोटी गमावलेली नाही. त्याने १० पैकी ९ कसोटी जिंकल्या आहेत आणि एक कसोटी अनिर्णीत राहिली आहे. हेजलवूड संघात असताना कांगारूंनी लॉर्डस्वर एकही कसोटी गमावली नव्हती, त्याला छेद मिळाला. हेजलवूड, कमिन्स आणि स्टार्क हे त्रिकूट संघात असताना कांगारूंनी आजवर एकाही आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावलेला नव्हता, त्यालाही छेद मिळाला. आजवरच्या तीन कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकवेळी नवा विजेता उदयास आला आहे.

२०२१ मध्ये न्यूझिलंड, २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया तर २०२५ मध्ये द. आफ्रिका विजेता ठरला. २०२५ हे वर्ष अनेक क्रीडा प्रकारांत नवविजेत्यांचे वर्ष ठरले आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मेन संघाने जेतेपद मिळवले. बिग बॅश लीगमध्ये होबार्ट संघाने १३ वर्षांनंतर प्रथमच जेतेपद मिळवले. स्पेनचा अल्काराझ पॅरिसमधील ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत लाल मातीचा बादशहा ठरला. पहिले दोन सेट गमावूनही त्याने नंतरचे तिन्ही सेट जिंकले. एकंदरीत २०२५ हे वर्ष नवविजेत्यांचे वर्ष ठरले आहे. द. आफ्रिकेच्या कसोटी संघाला सुमारे ३० कोटींचे तर उपविजेत्या ऑस्ट्रेलियाला १७.५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR