लातूर : एजाज शेख
लातूर जिल्हा तीव्र दुष्काळ आणि वाढत्या महागाईच्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. मान्सूनच्या दगाबाजीमुळे ग्रामीण भागात भीषण परस्थिती निर्माण झाली आहे. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तंूच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. या महागाईचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. पावसाअभावी खरीप हातचे गेले. ज्या शेतक-यांकडे सिंचनाची सोय होती त्यांच्या शेतात खरीपाचे थोडेसे पदरात पडले. परंतु, तेही ‘बाकी कुछ बचातो महंगाई मारगयी’, अशी अवस्था पहावयास मिळत आहे. गेल्या महिनाभरात किराणा, भूसार मालाच्या महागाईत सरासरी ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने हा अतिरिक्त भार दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे.
यावर्षीच्या हंगामात सर्व व्यवस्थित होईल, ही आस उराशी बाळगून जगणारा शेतकरी जेव्हा काळजातून खचतो, तेव्हा संपूर्ण गावखेड्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडताना दिसते. शेतात काम नाही अन् विहिरींचे तळ दिसायला लागतात, तेव्हा जगण्याचा भीषण संघर्ष सुरू होतो. घरदार, शेतजमीन आणि मुक्या जनावरांना सोडताना त्या शेतक-याच्या काळजात किती कालवाकालव होत असेल, ही कल्पना आभाळयातना भोगणाराच सांगू शकतो. दुष्काळ केवळ पिकेच जाळत नाही, तर तो ग्रामीण संस्कृतीचा गळा दाबतो. दुष्काळाने होळपणा-या शेतक-यांना सरकारने ५ हजार रुपये अग्रिम रक्कम देण्याचे जाहिर केले आहे.
वाढत्या महागाईत ५ हजारात चार सदस्यांच्या घरात किराणा, भूसारमालसुद्धा येत नाही. एकीकडे महागाई रोखण्यात सरकारला आलेले अपयश आणि दुसरीकडे मदतीत कंजूशी. ही सरकारची पॉलिसी शेतक-यांना अधिक संकटात टाकणारी आहे. ग्रामीणसोबत शहराच्याही अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरीच असतो. शेतकरी शेतात पिकलेला माल शहराच्या बाजारात विकते. पैसे हाती पडले की, तो शहरातून जीवनावश्यक वस्तू खरेदी करतो. शेतक-यांमुळेच बाजारपेठेत पैसा फिरत असतो. शेतक-याच्याच हात रिकामा राहिल्यास बाजारपेठेत पैसा येणार कोठून? त्याचा बाजारपेठेतील विविध घटकांवर मोठा परिणाम होतो. पैसाच फिरला नाही तर बाजारपेठा कोलमडते. नेमकी तीच परिस्थिती आज लातूर जिल्ह्यातील बाजारपेठांमधून पहावयास मिळत आहे.
















