औसा : संजय सगरे
तालुक्यासह लातूर जिल्ह्यात यंदा पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून खरीप पिकांबरोबरच जनावरांच्या चा-याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांच्या शेतात उपलब्ध असलेले ऊसाचे वाडे जनावरांसाठी महत्त्वाचा हिरवा चारा ठरू शकतात. मात्र ऊसतोडणी यंत्राद्वारे झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाडे शेतातच वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चा-याचा उपयोग पशुधनासाठी करून घेण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दुष्काळामुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी शेतातील नैसर्गिक चारा उपलब्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे पशुपालकांसमोर जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा वेळी ऊसाच्या वाड्यांचा उपयोग जनावरांसाठी चारा म्हणून केल्यास पशुधनाला मोठा आधार मिळू शकतो. सध्या अनेक ठिकाणी ऊसतोडणी हार्वेस्टरच्या माध्यमातून केली जाते. हार्वेस्टरने ऊस तोडताना ऊसाचे वाडे मोठ्या प्रमाणावर शेतातच पडून राहतात किंवा त्यांचा चारा म्हणून अपेक्षित उपयोग होत नाही. याउलट मनुष्यबळाच्या माध्यमातून ऊसतोडणी केल्यास वाडे वेगळे करून त्यांचा चारा म्हणून वापर करणे शक्य होते. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊसाच्या वाड्यांचा जास्तीत जास्त उपयोग पशुधनासाठी करून घेण्याची आवश्यकता आहे.
















