धाराशिव : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या भागातील कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेत दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांकडून शालेय शुल्क माफ करण्यात आले असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले आहे. असे असताना देखील काही शाळांकडून सक्तीने फी वसूल केली जात असल्याचे समोर आले. यावर फी वसूल करून शाळांनी खोडसाळपणा करू नये, असा इशारा भोसले यांनी दिला आहे.
शालेय फीबाबत सरकारने जीआर काढला आहे. मात्र, शाळा फी घेत असतील तर ती वसूल करू नये, अशा कडक सूचना शाळांना देण्यात येतील. शासन निर्णय असताना त्याचे पालन व्हायलाच हवे. मात्र, काही शाळांकडून हा खोडसाळपणा केला जात असेल, तर त्यांच्याबद्दल माहिती घेऊ, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले असताना ते बोलत होते.
दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी देवीकडे साकडे
दुष्काळात शेतक-यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहता यावे आणि राज्यातील परिस्थिती सुधारावी, यासाठी आई तुळजाभवानीकडे साकडे घातल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते. शेतक-यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.
















