मुंबई : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. दुसरा ‘गोध्रा’ घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
राज्यातील महापालिकांचे विश्लेषण करताना मीडिया मुसलमानांच्या हाती राजकारण जात आहे. आता हिंदूंनी सावध राहावे आणि तलवारी काढून राहावे, असे ध्रुवीकरण करताना दिसत आहे. म्हणून मी म्हणतो, की देशभरामध्ये दुसरा ‘गोध्रा’ घडण्याची शक्यता दिसते, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील माध्यमांशी संवाद साधताना, देशातील सध्याची सामाजिक, राजकीय, परराष्ट्रीय, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे विश्लेषण करताना, अग्निवीर जवानांसाठी मोठी मागणी केली. याच वेळी देशात दुसरा ‘गोध्रा’ होईल, असे भाकित वर्तवले.
महाराष्ट्राच्या महापालिका निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण करताना त्यांनी माध्यमांनी चुकीचे चित्र रंगवल्याचे सांगितले. मुस्लिम समाज आता काँग्रेससोबत राहिलेला नाही. त्याने ‘एमआयएम’चा पर्याय निवडला आहे. माध्यमे सांगत आहेत, की ‘एमआयएम’च्या १२३ जागा आल्या. जसे काय हे पहिल्यांदाच आले. पण वास्तव हे आहे, की जेव्हा मुस्लिम समाज काँग्रेस किंवा इतर पक्षांसोबत होता, तेव्हा मुस्लिम प्रतिनिधींची संख्या २४० ते २५० च्या आसपास असायची, याकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, मुस्लिम प्रतिनिधींच्या जागा प्रत्यक्षात कमी झाल्या आहेत. पण मीडिया मात्र सामान्य माणसाला असे दाखवण्याचा प्रयत्न करतो, की मुसलमानांच्या हाती राजकारण जात आहे आणि आता हिंदूंनी सावध राहावे आणि तलवारी काढून राहावे, असे ध्रुवीकरणाचे राजकारण मला दिसते. म्हणून मी म्हणतो, की देशभरामध्ये दुसरा ‘गोध्रा’ घडण्याची शक्यता मला दिसते, असे खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आरएसएसने लिहिलेला इतिहास मुख्यमंत्र्यांनी वाचावा
इतिहासाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांचाही लढा ब्रिटिशांविरोधात होता. टिपू सुलतानला हरवण्यासाठी पेशवे कोणासोबत सामील झाले होते, हा इतिहास मुख्यमंत्र्यांनी वाचावा. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेला इतिहास वाचला तरी चालेल, म्हणजे मुख्यमंत्री अशी चुकीची वक्तव्ये करणार नाहीत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

