चारठाणा : देवगाव शिवारात झाडाच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा चारठाणा पोलिसांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास छापा टाकत पदार्फाश केला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह एकूण १ लाख २ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विविध गावांतील ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
देवगाव शिवारातील आमवन जवळील जिनिंगच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत झाडाखाली काही लोक गोलाकार बसून पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती चारठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून टाकलेल्या धाडीत पोलिसांना पाहताच जुगा-यांची एकच पळापळ झाली. पोलिसांनी घेराव घालून ११ जणांना रंगेहात ताब्यात घेतले. यामध्ये खाजाभाई, रा. सेलु, कमलाकर विश्वनाथ देशमुख, रा. टाकळी कुंभकर्ण, रामकिसन साहेबराव गाडे, रा. सातोना, अशोक लक्ष्मण आखात, रा.सातोना, विजय नारायण कुरवाळे, परभणी, अजरखान अजीजखान पठाण, रा. मंठा, विजय विठ्ठल पोटे, रा.परतूर, साहेबराव लक्ष्मण गाडेकर, रा. सातोना, ज्ञानेश्वर आत्माराम लहाने, रा.आहेर बोरगाव, अजय संपत बीडव, रा.सातोना, अंकुश बजरंगलाल जैस्वाल, रा. सातोना, ता.परतूर,जि.जालना यांचा समावेश आहे.
या कारवाईत ५ हजार ९८० रुपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, वेगवेगळ्या कंपन्यांचे ९ मोबाईल, २ दुचाकी वाहने असा एकूण १ लाख २ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या फिर्यादीवरुन चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आला आहे. पुढील तपास पोह. थोरे हे करत आहेत. आरोपींना कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
















