27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeलातूरदेवणीत पंचायत समिती ताब्यात ठेवण्यात भाजपला यश

देवणीत पंचायत समिती ताब्यात ठेवण्यात भाजपला यश

वलांडी : हसन मोमीन
देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीसाठी सोमवारी शांततेत मतमोजणी झाली. तीन जिल्हा परिषद गटात दोन भाजपा तर एका गटात काँग्रेसने विजय मिळवला आहे तर सहा पंचायत समिती गणात चार गण भाजपा तर एका गणात काँग्रेस व एका गणात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे.
तालुक्यातील जवळगा व वलांडी जिल्हा परिषद गट भाजपाने पुन्हा ताब्यात ठेवला तर बोरोळ गटात काँग्रेसने विजय मिळवला. वलांडी, जवळगा, दवणहिप्परगा, तळेगाव (भोगेश्वर) या चार गणात भाजपाने विजय मिळवला तर बोरोळ पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विजय मिळवला. विळेगाव पंचायत समिती गण काँग्रेसने ताब्यात घेतली आहे. जवळगा जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाने रामलिंग शेरे यांनी काँग्रेसचे विकास डगवाले यांचा पराभव करीत पुन्हा एकदा भाजपाला विजय मिळवून  दिला आहे. वलांडी जिल्हा परिषद गटात तळेगावकर कुटुंबीयांच्या उषा संभाजीराव पाटील तळेगावकर यांनी काँग्रेसच्या अंजली अजित बेळकोणे यांचा पराभव केला आहे. तर बोरोळ जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे औदुंबर पांचाळ यांनी भाजपाचे धोंडीराज गुणाले यांचा पराभव करीत तालुक्यात एकमेव जागा राखण्यात यश मिळवले आहे.
 पंचायत समितीच्या जवळगा गणामध्ये भाजपाच्या महादेवी पाटोळे यांनी काँग्रेसच्या सुरेखा सोनकांबळे यांचा पराभव केला आहे. दवणहिप्परगा पंचायत समिती गणामध्ये भाजपाच्या अंकिता पाटील यांनी काँग्रेसच्या प्रभावती पाटील यांचा पराभव करीत सत्ता कुंटुबातच ठेवण्यात यश मिळवले आहे. वलांडी पंचायत समिती गणात भाजपाचे बाळासाहेब पाटील यांनी काँग्रेसचे उमेश बिरादार यांचा पराभव केला आहे. विळेगाव गणात काँग्रेसचे नागनाथ सगर यांनी भाजपाचे विजयकुमार बोरोळ यांचा पराभव केला आहे. बोरोळ गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन बिरादार (भोपणीकर) यांनी भाजपाचे  प्रमोद पाटील यांचा पराभव केला आहे. बोरोळमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसने विजय मिळवला असला तरी पंचायत समिती गणात काँग्रेसचा उमेदवार तिस-या स्थानावर राहिला आहे. तळेगाव पंचायत समिती गणामध्ये भाजपाच्या अश्विनी हंचनाळे यांनी काँग्रेसच्या प्रणीती चामले यांचा पराभव केला आहे.
जवळगा  जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या मातब्बर उमेदवारासमोर भाजपाच्या रामलिंग शेरे यांनी कडबी झुंज देत एकहाती विजय मिळवला. वलांडी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित बेळकोणे यांच्या पत्नी अंजली बेळकोणे यांचा पराभव करत भाजपाच्या उषाताई पाटील तळेगावकर यांनी विजय मिळवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR