देवणी : बाळू तिपराळे
देवणी तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती गंभीर बनत असून, पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यातील आठ तलावांपैकी सात तलावांमध्ये पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे, तर वागदरी तलावात केवळ ७.२८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धनेगाव बॅरेजमधील पाणीसाठाही अवघ्या दोन टक्क्यांवर आल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील दवणीहिप्परगा, वडमुरंबी, गुरनाळ, बोरोळ, लासोना, अनंतवाडी आणि आनंदवाडी या तलावांमध्ये सध्या पाणीसाठा शून्य टक्के आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, शेती आणि जनावरांच्या चा-याचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. धनेगाव बॅरेजमधील पाणीसाठा कमी झाल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे. दुसरीकडे, तलावांतील पाण्याची स्थिती चिंताजनक असल्याने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तालुक्यातील दवणीहिप्परगा, वडमुरंबी, गुरनाळ , बोरोळ, लासोना, अनंतवाडी आणि आनंदवाडी या सात तलावांमध्ये पाणीसाठा शून्य टक्के आहे. वागदरी तलावात ७.२८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वैभव पाटील यांनी दिली.
















