21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रदेवाभाऊ त्यांचे आदर्श असतील तर त्यांची पूजा करावी : शिरसाट

देवाभाऊ त्यांचे आदर्श असतील तर त्यांची पूजा करावी : शिरसाट

मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात महायुती स्थापन झाल्यानंतर सर्व काही स्थिर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे राहिल्यामुळे महायुतीत मोठा दुरावा असल्याचे चित्र समोर आले.

संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, मुंबईचा महापौर महायुतीचाच असावा, या भूमिकेवर ते ठाम आहेत. मात्र फक्त भाजपचाच महापौर होणार, असे सतत बोलून वातावरण बिघडवण्याची जबाबदारी काही जण घेत असल्याचे त्यांनी सूचित केले. देवाभाऊ हे त्यांचे आदर्श असतील तर त्यांनी त्यांची पूजा करावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लोढांना लगावला आणि प्रत्येकवेळी प्रतिक्रिया द्यावी लागल्यामुळे बेबनाव असल्याचे चित्र तयार केले जाते, याबद्दल नाराजीही व्यक्त केली. महायुतीचे बंध मजबूत ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, मुंबईचा महापौर महायुतीचाच झाल्यास कॉलर टाईट होईल, एकट्या भाजपचा नव्हे. त्यामुळे शिरसाट यांच्या या प्रतिक्रियेमुळे सत्ताधारी युतीमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भही शिरसाट यांनी मांडला. चव्हाण यांनी आपले मागील वक्तव्य बदलल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यामुळे आता त्या वादाचा मुद्दा मिटल्याचेही मत व्यक्त केले. तसेच येणा-या अधिवेशनात महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून, त्यानंतरच पुढील रणनीती ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. एकत्र निवडणूक लढवणे हीच महायुतीच्या राजकीय गणितातील सर्वांत मोठी अट असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्यथा मतविभाजनामुळे महाविकास आघाडीला फायदा होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईचा महापौर भाजपचाच होणार – लोढांचे वक्तव्य चर्चेत

लोढा यांनी त्यांच्या भाषणात असे म्हटले होते की, मुंबईचा महापौर भाजपचाच होणार आहे आणि देवाभाऊदेखील त्या वेळी शपथविधीसाठी महापालिकेत येतील. तसेच राज्यातील अनेक पक्ष देवाभाऊंच्या इशा-यावर चालतात, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावर शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोढांच्या वक्तव्याचा खुला समाचार घेतला आणि शिवसेना आपल्या ध्येय-धोरणांवर चालते, कोणाच्या इशा-यावर नव्हे, असा ठाम दावा केला. काही गोष्टी त्यांच्या म्हणण्यात ख-या असतील, पण सर्वच पक्ष देवाभाऊ चालवतात हे चुकीचे असून वास्तविकता वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रतिउत्तरामुळे दोन्ही पक्षांतील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR