लातूर : प्रतिनिधी
देशात आणि महाराष्ट्रातही सत्ताधा-यांनी ओबीसी समाजाचा फक्त फायदा घेतला आहे. ओबीसी समाजाला सत्तेचा वाटा मिळू दिला नाही. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुर्तपणे ओबीसींममध्ये फुट पाडली. ओबीसींचे संघटन होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेतली. देवेंद्र फडणवीस ओबीसींसाठी घातक व्हायरस आहे.या व्हायरसमुळे ओबीसी आज मागे पडला आहे. समस्त ओबीसी समाजाला जागृत करुन त्यांना समान न्याय आणि सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच काँगे्रस पक्षाच्या ओबीसी सेलमार्फत राज्यात ओबीसी संवाद यात्रा सुरु केली आहे, असे काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगीतले.
काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे हे रविवारी लातूरच्या दौ-यावर होते. त्यांनी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळूंके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य एकनाथ पाटील, ओबीसी युवकचे विष्णु धायगुुडे, संभाजी सुळ, व्यंकटेश पुरी, अजित निंबाळकर, केतन हलवाई, विजयकुमार साबदे, सुभाष घोडके, शरद देशमुख, प्रविण सूर्यवंशी, प्रा. प्रविण कांबळे आदी उपस्थित होते.
सहा महिन्यांपुर्वी दिल्लीत काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी ओबीसींची एक सभा घेतली होती. त्या सभेनंतर ओबीसींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पुण्यातील फुले वाड्यातील समता भूमीला वंदन करुन दि. २० एप्रिलपासून ओबीसी संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली, असे नमुद करुन प्रा. डॉ. यशपाल भिंगे पुढे म्हणाले, या यात्रेत ओबीसींच्या नेत्यांशी, ओबीसींशी आस्था असलेले साहित्यिक, लेखक, पत्रकार, ओबीसींच्या वस्त्यांना भेट दिल्या जात आहेत. यादरम्यान कोल्हापुरमधील शांतीनगरमध्ये गणेश काळे यांनी वसवलेली फाशीपारद्यांची वस्ती, तासगावमधील व्यंकप्पा भोसले यांची नंदीवाल्यांची वस्ती तसेच सोलापूर येथे सरफराज अहेमद यांची भेट घेतली. धाराशिवला उद्धवराव पाटील यांच्या कुटूंबियांची भेट घेतली.
ओबीसी हा मुळचा निसर्गवादी समाज आहे. उत्पादक समाज आहे. परंतु, राजकीय महत्वाकांक्षेचा अभाव आणि राजाश्रयही मिळाला नाही. राजकीय प्रवाहाचे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. परंतु, ‘मी पुन्हा येईन’ या सारखे भीषण वाक्य दुसरे कोणतेच नाही. सत्तेने पछाडलेले हे वाक्य आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी भूमीत विघटनवादी शक्ती फोफावले आहे. कपाळी भंडारा लावुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत. ३ वेळा सत्तेत आले परंतु, धनगर समाजासह ओबीसींचे प्रश्न सोडवले नाही. फडणवीस यांना बहुजन नायकांच्या नावाने दंगली घडवायच्या आहेत. जगण्या, मरण्याच्या प्रश्नांवर सत्ताधारी बोलत नाहीत. बहुजन समाजाची प्रचंड शक्ती असताना सनातीनी सत्तेत कसे?, याचा प्रचंड राग आहे.

