मुंबई : प्रतिनिधी
आशिया कप २०२५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची चांगलीच चर्चा होत आहे. पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानविरोधात सामना खेळू नये, अशी मागणी सातत्याने विरोधकांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ‘हर घर से सिंदूर’ आंदोलन राबवणार आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, पहलगाममध्ये हल्ला झाला, त्याचे रक्त अजून सुकलेले नाही. नीरज चोप्राला अंधभक्तांनी देशद्रोही ठरवले होते, मग आता पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना का खेळत आहात? यांना देशापेक्षा व्यापार महत्त्वाचा वाटतो,’ असे म्हणत त्यांनी आपली उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘देशभक्तीचा हा व्यापार सुरू आहे. देशभक्तीची ही थट्टा आहे. व्यापारापुढे त्यांना देशाची देखील काही किंमत राहिलेली नाही. मला राजनाथ सिंह आणि अमित शहा यांना विचारायचे आहे की तुम्ही हे युद्ध संपले आहे असे जाहीर करणार का? हे अंधभक्त सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानची बहीण म्हणाले होते’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली. ‘‘आपली पाकिस्तानविरुद्धची भूमिका काय हे स्पष्ट केले पाहिजे, ते म्हणाले होते, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. आता एखाद्या खेळावर बहिष्कार टाकला तर कोणते मोठे संकट ओढवणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवणार नाही, असे ठणकावून सांगितले पाहिजे.’’ असे ते पुढे म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’वेळी भालाफेकपटू नीरज चोप्रावर टीका करण्यात आली होती. त्याला देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. त्याने पाकिस्तानी प्रशिक्षक, खेळाडूंना भारतात आमंत्रित केले होते. त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता बीसीसीआय पाकिस्तानसोबत सामना खेळत आहे. आता नेमकं काय बदललं आहे हे पाकिस्तानसोबत आपण युद्ध पुकारलं होतं. मात्र आता त्यांच्यासोबत क्रिकेट खेळतो आहोत, असे म्हणत हल्लाबोल केला.
‘‘आज एका उद्विग्न भावनेतून आणि विषण्ण मनाने मी तुमच्याशी बोलत आहे. उद्या अबूधाबीत भारत-पाक क्रिकेट सामना आहे. अजूनही पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचे रक्त सुकले नाही. त्यांचे घाव भरले नाहीत. त्यानंतर भारतीयांना वाटले होते की, आपण आता पाकला जागेवर ठेवणार नाही. त्याचे दोन-तीन तुकडे करून टाकू. त्या दृष्टीने एक चढाई आणि युद्धही केले गेले. त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. मधल्या काळात आपल्या संरक्षणमंत्र्यांनी हे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचे सांगितले. एकूणच ते जे काही वातावरण होते, ते आपल्यासाठी नव्हते. कारण, काही दिवसांनी किंवा वर्षांनी पाक आपल्या देशात अतिरेकी हल्ले करतो. त्यावेळी आपण सर्वजण जागे होतो. सरकारही चवताळून उठते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
















