इंधनाचाही पुरेसा साठा, केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इराणमधील युद्धविरामानंतर देशात एलपीजी, पीएनजी तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर केंद्र सरकारने आज मोठा खुलासा करत दिलासा दिला. सरकारकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अमेरिका-इस्रायल आणि इराकमध्ये युद्ध सुरू झाल्याने कच्चे तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला होता. कारण इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून येणारे तेल आणि गॅसचे जहाज अडवले होते. त्यामुळे संपूर्ण जगातील २० टक्के गॅस आणि तेल पुरवठा ठप्प झाला होता.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात दररोज सुमारे १ लाख एलपीजी सिलेंडरची विक्री होत असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. एलपीजी वितरक आणि पेट्रोल पंपांकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. घरगुती एलपीजी पुरवठा सामान्य असून ९८ टक्के बुकिंग ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. घरगुती गॅससोबतच व्यावसायिक एलपीजी पुरवठाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या सुमारे ७० टक्के पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. १४ मार्चपासून आतापर्यंत सुमारे १ लाख ६ हजार टन एलपीजीची विक्री झाली असून दररोज ६ ते ६.५ हजार टन विक्री होत असल्याची माहिती देण्यात आली.
इराणमधील युद्धविरामानंतर जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरचा दबाव कमी झाला आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसून येत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये ४० दिवस युद्ध झाले. त्यानंतर आता अमेरिका आणि इराणमध्ये २ आठवडे युद्धविरामाचा करार झाला आहे. त्यामुळे युद्धाची तीव्रता कमी झाली असून, आता होर्मुझमधून तेल, गॅसचे जहाजही बाहेर पडत आहेत. भारतासाठी तर इराणने सहकार्याची भूमिका घेतली आहे. तसेच भारताने इतर देशांतूनही तेल, गॅस आयात केली आहे. त्यामुळे भारतातील टंचाईची तीव्रता आता कमी झाली असून, गॅस आणि तेलाचा पुरवठाही सुरळीत झाला असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
लहान सिलेंडरचा
पुरवठा वाढवला
५ किलोच्या एलपीजी सिलिंडरबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला. नागरिकांना सुलभता मिळावी, म्हणून ओळखपत्राशिवायही या सिलिंडरचा पुरवठा दुप्पट करण्यात आला आहे. दररोज सुमारे १ लाख ५ किलो सिलिंडर विकले जात असून २३ मार्चपासून आतापर्यंत ११ लाख सिलिंडरची विक्री झाली आहे.
पीएनजीचा वापर
वाढविण्यावर भर
सरकारकडून एलपीजीऐवजी आता पीएनजी वापर वाढवण्यावरही भर दिला जात आहे. यासाठी देशभरात २४०० हून अधिक जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नैसर्गिक वायू पुरवठ्यातही सुधारणा होत असून उद्योग क्षेत्राला सुमारे ८० टक्के आणि खत उद्योगाला ९५ टक्के पुरवठा पुन्हा सुरू झाल्याचे मंत्रालयाने सांगितले.

