भारताचे ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संघर्षात पाकने भारताची विमाने पाडल्या प्रकरणी खुलासा सिंगापूरला का केला? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. ‘सीडीएस’ चौहान यांनी विमाने पाडली गेल्याचा खुलासा सिंगापूरमध्ये केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. रमेश म्हणाले की, लष्करी व परदेशी धोरणाबाबत सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावणे गरजेचे आहे. ‘सीडीएस’ अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत महत्त्वाची माहिती सिंगापूरला असतानाच का दिली? पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत पहिल्यांदा ही माहिती देणे गरजेचे होते, असे रमेश म्हणाले. कारगील युद्धानंतर भारताच्या संरक्षण तयारीबाबत विशेष पुनर्आढावा समिती ३ दिवसांत स्थापन करण्यात आली होती. आताही अशाच प्रकारची समिती स्थापन केली पाहिजे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे वडील त्या समितीचे अध्यक्ष होते. त्या वेळी अहवाल संसदेत मांडून त्यावर व्यापक चर्चा झाली होती.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेल्या भारत आणि पाकिस्तान संघर्षाबाबत केंद्र सरकारने देशाची दिशाभूल केली असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी शनिवारी केला तर या संघर्षात भारताचे किती नुकसान झाले या मागचे सत्य देशाला सांगावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते उत्तम कुमार रेड्डी यांनी केंद्र सरकारकडे केली. संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये एक वृत्तवाहिनी आणि काही वृत्तसंस्थांशी बोलताना ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताच्या लढाऊ विमानांचे नुकसान झाल्याची कबुली दिल्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले. खरगे म्हणाले, स्वतंत्र तज्ज्ञांच्या समितीने भारताच्या संरक्षण सज्जतेचा सर्वंकष आढावा घेतला जावा, अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. कारगील युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘कारगिल आढावा समिती’ स्थापन केली होती त्या धर्तीवर ही समिती असावी या मागणीचा खरगे यांनी पुनरुच्चार केला. भारतीय सैन्याचे धाडस आणि शौर्य याला आपला पक्ष सलाम करतो; पण सर्वंकष सामरिक आढावा ही काळाची गरज आहे, असे खरगे म्हणाले. संरक्षण दलप्रमुखांनी सिंगापूरमध्ये मुलाखतीत केलेल्या टिप्पण्यानंतर काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारणे आवश्यक झाले आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्यात आले तर तसे करता येईल; परंतु मोदी सरकार देशाची दिशाभूल करत आहे, असा खरगे यांनी आरोप केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत-पाकिस्तानदरम्यान शस्त्रविराम घडवल्याचा दावा वारंवार करत आहेत त्याबद्दल केंद्र सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही काँग्रेसने केली. अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांनी न्यायालयात कथित हस्तक्षेपाबद्दल निवेदन दिले आहे. त्यावर मोदी यांनी देशाच्या हितसंबंधांपेक्षा व्यापाराला अधिक महत्त्व दिले का? असा प्रश्न काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला. मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे वर्णन देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठे आणि सर्वांत यशस्वी दहशतवादविरोधी मोहीम असे केले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडले नाही तर आपल्या संस्कृतीवर हल्ला केला. त्यांनी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी भारताच्या महिला शक्तीला आव्हान दिले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या दिवशी भारताच्या काही लढाऊ विमानांचे नुकसान झाले, असे संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान यांनी सिंगापूरमधील मुलाखतीत मान्य केले मात्र त्यांनी त्याचा तपशील दिला नाही. किती विमानांचे नुकसान झाले त्यापेक्षा ते का झाले, हे शोधून काढणे अधिक महत्त्वाचे होते, असे ते म्हणाले. भारताची ६ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा संपूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. विमानांचे नुकसान का झाले त्याचा शोध घेऊन आपल्या डावपेचामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार आम्ही डावपेचांमध्ये बदल केले आणि पाकिस्तानवर निर्णायक आघाडी प्रस्थापित केली, अशी माहिती सीडीएस चौहान यांनी दिली. भारतीय हवाई दलाचे डीजीएओ एअर मार्शल ए. के. भारती यांनी ११ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लढाऊ विमानांचे नुकसान झाले, अशी कबुली दिली होती मात्र हवाई दलाचे सर्व वैमानिक सुरक्षितपणे परत आल्याचे सांगितले होते. आम्ही केलेल्या डावपेचात्मक चुका समजून घेता आल्या, त्या दुरूस्त करता आल्या आणि पाकिस्तानातील धावपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले.
त्यांच्या सर्व हवाई संरक्षण यंत्रणा आम्ही भेदल्या आणि अचूकपणे हल्ले केले, असे जनरल अनिल चौहान यांनी सांगितले. सिंगापूरमधील ब्ल्यूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पाकविरुद्धच्या संघर्षात भारतीय विमाने पडली का? किती पडली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला स्पष्ट उत्तर देण्याचे सीडीएस चौहान यांनी टाळले होते. युद्ध म्हटले की नुकसान होतेच; परंतु ६ भारतीय विमाने पाडल्याचा पाकचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असे सीडीएस म्हणाले होते तसेच भारत-पाक संघर्षात अण्वस्त्रांचा वापर करण्याचा मुद्दा चर्चेत नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकने सातत्याने विश्वासघात केल्याचा आरोप जनरल चौहान यांनी केला. वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि आता सीडीएस यांच्या वक्तव्यामुळे पाकविरुद्धच्या संघर्षात भारतीय लढाऊ विमानांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याच्या बातम्यांना बळ मिळत आहे, एवढे मात्र खरे. पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात भारतीय लढाऊ विमानांचे नुकसान झाल्याचे सीडीएस चौहान यांनी अप्रत्यक्षपणे कबुल केले आहे मात्र त्यांनी ही कबुली विदेशात जाऊन का दिली? हा खरा प्रश्न आहे. भारतीय लढाऊ विमानांची हानी झाल्याची कबुली विदेशात दिल्याने त्यातील गांभीर्य अधिकच वाढले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय वायुदलाची ६ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. तो दावा सीडीएस चौहान यांनी फेटाळला आहे मात्र भारतीय विमानांचे थोडे-फार नुकसान झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीही दिली आहे; पण किती विमानांचे नुकसान झाले हे स्पष्टपणे सांगत का नाहीत? पाकविरुद्धच्या संघर्षात भारताचे किती नुकसान झाले ते संरक्षण खाते का जाहीर करत नाही? लष्करी संघर्षादरम्यान झालेले नुकसान जाहीर करत नसल्यामुळे पाकिस्तान आपल्या शौर्याची टिमकी वाजवत आहे. पाकिस्तानचा दावा खोडून काढायचा असेल तर युद्धात भारताचे खरे किती नुकसान झाले ते जाहीर करायलाच हवे. नाही तर विनाकारण गैरसमज निर्माण होण्याला जागा मिळते, विरोधी पक्षही ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ असे म्हणू लागतात!