14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रदेशात १ ऑक्टोबरपासून ४८ टक्के अधिक पाऊस!

देशात १ ऑक्टोबरपासून ४८ टक्के अधिक पाऊस!

मुंबई : प्रतिनिधी
देशात यंदा मे महिन्यापासून म्हणजेच भर उन्हाळ््यापासून पावसाचा धडाका सुरू आहे. देशात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने कहर केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली. महाराष्ट्रातही मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे यासह राज्यात सर्वत्र पावसाचा धडाका अद्याप सुरू आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागांना महापुराचा तडाखा बसला. त्यामुळे पिके पाण्यात गेली. त्यामुळे खरीप हंगाम जवळपास हातातून गेला. आता दिवाळी संपत आली तरी अनेक भागांत पावसाचा जोर कायम असून, १ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान, देशात ११७ मि.मी. पावसाची नोंद झाली. म्हणजेच ज्या महिन्यात थंडी सुरू व्हायला पाहिजे, त्याच महिन्यात देशात सरासरीच्या ४८ टक्के पाऊस अधिक झाला.

नैऋत्य मोसमी वा-यांनी माघार घेतल्यानंतर लगेचच निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात ऑक्टोबरअखेरपर्यंत आणि अजूनही पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात ७७.७ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. तसेच १ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या दरम्यान देशात ११७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. या कालावधीत ७९.७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु देशात ४८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील ब-याच भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईसह राज्यातील इतर भागांतून १० ऑक्टोबर रोजी नैऋत्य मोसमी वा-यांनी माघार घेतली. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी मोसमी वा-यांनी संपूर्ण देशातून माघार घेतली. काही दिवसांतच अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळाची तर बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळाची निर्मिती झाली. याचाच प्रभाव म्हणून राज्यात अनेक भागांत पाऊस कोसळला. मुंबईसह विदर्भात जोरदार पाऊस झाला. १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ७७.७ मि.मी. पावसाची म्हणजेच सरासरीपेक्षा ५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.
राज्यातील काही भागांत अजूनही पुढील ३ ते ४ दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. इतर भागांत ढगाळ वातावरण राहील. पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

कोकणात सर्वाधिक,
सर्वत्र सरासरी अधिक
१ ऑक्टोबरपासून कोकणात सर्वाधिक पाऊस झाला. तेथे सरासरी २३८.९ मि.मी. पाऊस झाला. या कालावधीत सरासरी ११८.८ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. म्हणजेच या भागात तब्बल १०१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात ७५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. तेथे या कालावधीत ७९.६ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असते. येथे ५ टक्के कमी पाऊस नोंदला गेला. विदर्भात ६९.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. या कालावधीत येथे ५९.९ मि.मी. पाऊस पडतो. येथेही १८ टक्के पाऊस अधिक नोंदला गेला. मराठवाड्यात ८०.६ मि. मी. पाऊस नोंदला गेला. येथे ७५.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असते.

लातूरमध्ये जोरधार
लातूर जिल्ह्यात आधीच अतिवृष्टीने कहर केला आहे. त्यामुळे शेतकरी कोलमडलेला असतानाच पाऊस पाठ सोडायला तयार नाही. सोमवारी सायंकाळी आकाशात अचानक ढग दाटून आले आणि काही वेळातच पावसाने झोडपायला सुरुवात केली. अर्ध्यातासापेक्षा जास्तवेळा जोरधार सुरू होती. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी सखल भागाला तलावाचे स्वरूप आले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR