तापमानात वाढ, ५ दिवस पावसाची शक्यता नाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदा देशात पावसाने चिंता वाढवली आहे. काही भागांत तुफान पाऊस झाला तर ब-यांच भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे चिंता वाढलेली असतानाच आता देशातील ७० टक्के भागांतून मान्सूनचे ढग गायब झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. त्यामुळे पुढील ५ दिवस महाराष्ट्रासह देशांतील ब-याच भागांत पावसाची शक्यता नाही. विशेषत: महाराष्ट्रासह राजस्थान, दिल्ली-एनसीआर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही पावसाची शक्यता कमी आहे.
आता पावसाला विराम मिळाल्याने मध्य प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमान वाढले आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पॅसिफिक महासागरात तीन हवामान प्रणाली तयार होत आहेत. जर या बंगालच्या उपसागरात पोहोचल्या तर १८ ते २५ जुलै दरम्यान पावसाची दुसरी फेरी सुरू होऊ शकते. मान्सूनला सक्रिय ठेवणारी प्रणाली कमकुवत झाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार देशाच्या ७० टक्के भागातून मान्सूनचे ढग नाहीसे होण्यामागे सर्वांत मोठे कारण म्हणजे मान्सूनला सक्रिय ठेवणारी प्रणाली कमकुवत होणे हे आहे. ९ जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कोणतीही नवीन मजबूत कमी दाबाची प्रणाली तयार झाली नाही, ज्यामुळे मान्सूनच्या वा-यांना पुरेशी आर्द्रता मिळू शकली नाही. तसेच मान्सूनचा पट्टा त्याच्या नेहमीच्या जागेवरून उत्तरेकडे सरकला आहे. यामुळे मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारताच्या मोठ्या भागांमध्ये ढग आणि पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
सध्या पाऊस प्रामुख्याने उत्तर भारत, पूर्वेकडील राज्ये आणि ईशान्य भारतापुरता मर्यादित आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत देशाच्या बहुतेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता नाही. ऑल इंडिया वेदरच्या मते १२ जुलैनंतर काही दिवसांसाठी भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. कारण सध्या तीन प्रमुख जागतिक हवामान प्रणाली मान्सूनच्या विरोधात काम करत आहेत. म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत एल निनो/ला निनोशी संबंधित एक प्रणालीचा प्रभाव मान्सूनसाठी फारसा चांगला नव्हता. तथापि, मॅडेन-जुलियन ऑसिलेशन आणि काही लहान हवामान प्रणाली सक्रिय होत्या, ज्यामुळे भारताच्या अनेक भागांत चांगला पाऊस झाला.
विषुवृत्तीय रॉस्बी
लाटा प्रतिकूल स्थितीत
१२ जुलैनंतर विषुववृत्तीय रॉस्बी लाटा प्रतिकूल झाल्या आहेत, ज्यामुळे आर्द्रता आणि ऊर्जा भारताकडे येण्याऐवजी दुस-या दिशेने वाहत आहे. एमजेओदेखील एका कमकुवत टप्प्यात दाखल झाली आहे. एमजेओ ही एक हवामान लाट आहे, जी जिथे सक्रिय असते, तिथे ढग आणि पर्जन्यवृष्टी वाढवते. सध्या ती भारतासाठी अनुकूल नाही.
काश्मीर, उत्तराखंडमध्ये
ढगफुटीमुळे मोठे नुकसान
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री ढगफुटीमुळे पूर आला. अनेक शेतांचे नुकसान झाले आणि रस्ते वाहून गेले. उत्तराखंडमधील विकासनगर येथे मुसळधार पावसामुळे लखवार जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन झाले, ज्यात अनेक वाहने आणि यंत्रसामग्री गाडली गेली.
















