मुंबई : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रति लिटर प्रत्येकी ३ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणा-या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर ३-३ रुपयांनी महाग झाले आहे. हे नवीन दर १६ मे पासून लागू झाले आहेत. सुमारे ३ वर्षांनंतर दरांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर महागाईच्या भडक्यात घासलेट अर्थात रॉकेल ओतल्याची टीका केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. आखाती देशांमधील युद्ध फेब्रुवारी महिन्यापासून सुरू आहे. काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महागाईच्या संकटाबाबत तेव्हाच सरकारला सावध केले होते. मात्र, केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना करण्याचे टाळले. जनतेला तब्बल ३ महिने मूर्ख बनवले. आता निवडणुका संपताच मोदी सरकारने देशावर महागाईचे संकट लादले आहे. व्यावसायिक गॅस, पेट्रोल, डिझेल, दूध अशी प्रत्येक जीवनावश्यक वस्तू आता महाग झाली आहे. केवळ निवडणुका जिंकण्याच्या हट्टापायी मोदी सरकारने संपूर्ण देशाला महागाईच्या दरीत ढकलले आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सरकारचा स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढले आहेत. ते म्हणाले, कॉम्प्रोमाईज इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झाले ते देशाला महागाई आणि आर्थिक संकटापासून सुरक्षित ठेवण्यासाठी; सत्तेत येऊन इतर देशांतील दरांशी तुलना करून स्वत:चे अपयश झाकण्यासाठी नाही! सरकारचे काम राज्यकारभार चालवणे, हास्यास्पद तुलना करणे नाही.
हीच खरी अधोगती : खा. संजय राऊत
२०१४ पूर्वी तुलना व्हायची ती विकासाची. आपल्यापेक्षा पुढे असलेल्या देशांपासून, प्रेरणा घेण्यासाठी. ती तुलना नेहमीच प्रोत्साहन देणारी होती. आज तुलना होते, इंधन दरांची, कायदा-सुव्यवस्थेच्या बोजवा-याची, प्रशासनाच्या अपयशाची, आणि अशा देशांशी ज्यांचा भारतासोबत कधी उल्लेखही केला जात नव्हता. हीच खरी अधोगती आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
राष्ट्रप्रेमाखातर त्यागाची पहिली पावती ३ रुपयांची : सतेज पाटील
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही या प्रकरणी सरकारवर तोंडसुख घेतले आहे. राष्ट्रप्रेमाखातर त्यागाची पहिली पावती ३ रुपयांची. निवडणुकांपर्यंत ‘सब चंगा सी’ होतं. निवडणुकांच्या प्रचारात वास्तविक प्रश्नांऐवजी देव, देश आणि धर्म धोक्यात आणून जनतेच्या भावनांना हात घालण्यात आला. लोकांनी मतदान केले, निवडणुका संपल्या आणि आता जनतेने राष्ट्रप्रेमासाठी ‘त्याग करावा’ असा हट्ट! त्या राष्ट्रप्रेमासाठी त्यागाची पहिली पावती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवर ३ रुपयांची दरवाढ! जनतेने अजून किती सोसायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आता खिसा कापणीचा महासेल सुरू : अंबादास दानवे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणुकांचा ‘सेल’ संपलाय, आता खिसा कापणीचा ‘महासेल’ सुरू झालाय! निवडणुका संपेपर्यंत जे ‘दरबॉम्ब’ खिशात लपवून ठेवले होते, ते आता थेट जनतेच्या खिशावर पडू लागलेत. पंपावर रांगा लागल्यात आणि सरकारचं रेकॉर्ड मात्र तेच जुनं वाजतंय – ‘टंचाई कुठेही नाही!’ लोक पंपावर पेट्रोल घ्यायला उभे आहेत, तर ‘महागाईचा महोत्सव’ साजरा करण्यासाठी नाही, असे ते म्हणाले.
रोहित पवारांनी काढली मनमोहन सिंगांची आठवण
रोहित पवार म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग साहेबांच्या यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर प्रति बॅरल असतानाही तत्कालीन केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर ६० रुपयांच्या आसपास स्थिर ठेवून जनतेला महागाईची झळ लागू दिली नाही. आज ही दरवाढ भाजपच्या अंध भक्तांसाठी देशभक्ती असली तरी सामान्य माणसासाठी महागाईच्या भडक्यात टाकलेले घासलेट आहे. देशवासीयांनो आता आवाज उठवायचा नसेल तर आपल्या हातात एकच गोष्ट शिल्लक आहे… निमूटपणे सहन करणे.
निवडणुका संपल्या, आता वसुली सुरू : विकास लवांडे
शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. निवडणुका संपल्या… त्यामुळे आता मोदी सरकारची वसुली सुरू आहे. हा प्रश्न फक्त पेट्रोल-डिझेलच्या ३ रुपयांच्या दरवाढीचा नाही, तर सतत वाढणा-या महागाईच्या वाढत्या ओझ्याचा आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की, एकीकडे जनतेचे खिसे रिकामे होत आहेत, तर दुसरीकडे भाषणांमधील ‘अच्छे दिन’ मात्र अजूनही सुरूच आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
















