मुंबई : प्रतिनिधी
राज्यात दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज (१८ ऑक्टोबर) धनत्रयोदशी असल्याने अनेकजण मंदिरात दर्शनासाठी जात आहेत. पण याच धनत्रयोदशीच्या दिवशी राज्यात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे कारण म्हणजे राज्यात २ भीषण अपघातांमध्ये एकूण ९ जण ठार झाले आहेत. नंदुरबार-अस्तंबा यात्रेवरून परत येणा-या भाविकांवर काळाने घाला घातला आहे, भाविकांच्या पिकअप ट्रकला अपघात होऊन ६ जण ठार झाले तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला असून त्यात ३ ठार झाले आहेत. या दोन्ही अपघातांमुळे हळहळ व्यक्त होत असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अस्तंबा यात्रेवरून परत येणा-या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
सणासुदीच्या काळात अपघातांचे सत्र सुरूच असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. अस्तंबा यात्रेवरून परत येणा-या भाविकांवर काळाने झडप घातली. यात्रेहून परत येणा-या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात झाला आहे. चांदशैली घाटात वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, त्यामध्ये ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर १० पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अपघात स्थळी भयानक दृश्य असून तिथे मदत कार्य सुरू आहे. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची कार्यवाही सुरू असून तिथे उपचार करण्यात येतील. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
३ ठार, ५ जखमी
तर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव ते जउळका दरम्यानच्या समृद्धी महामार्गावरील डव्हा पेट्रोल पंपाजवळ रात्री अडीचच्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे. मुंबईवरून नागपूरच्या दिशेने जाणा-या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव असलेली कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. यात ३ ठार झाले. यात म्यानमार या देशातील ६ जणांच्या एकाच कुटुंबातील ४० वर्षीय वडील आणि १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर ६३ वर्षीय आजोबा गंभीर जखमी आहेत. आणखीही एका व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर या भीषण अपघातात कुटुंबातील आई, मावशी मामा आणि चालक असे ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
















