लातूर : प्रतिनिधी
बेमोसमी पाऊसाने लातूर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यंदा मोसमी पावसाळा लवकरच सुरु होईल, अशी आशा शेतक-यांना होती. पाऊस पडल्यामुळे मग्रारोहयोची कामे थांबतील आणि हाताला शेतीकामे मिळतील, अशी अपेक्षा मजूरांना होती. परंतू, पावसाने विश्रांती घेतल्याने अद्यापही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनची कामे सुरुच आहेत. त्यामूळे जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ४१८ मजुरांच्या हाताला काम मिळत आहे.
ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे, एकाही मजूराची कामासाठी भटकंती होऊ नये, ग्रामीण भागातील मजूराने मजूरीसाठी शहराकडे धाव घेऊ नये, म्हणुन शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. त्यामूळे डिसेंबरपासून ते जूनपर्यंत मजूरांना गावातच काम उपलब्ध होत आहे. कामाचा वेळेवर मोबदला मिळत असल्याने मजूरांचा ओढाही मग्रारोहयोच्या कामांकडे आहे.
लातूर जिल्ह्यात एकुण ७८६ ग्रामपंचायती असून त्यापैकी ४६४ ग्रामपंचायतींअंर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजूर अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. मग्रारोहयोतून सिंचन विहीर, बांबु लागवड, घरकुल, वृक्ष लागवड व संगोपन, रस्ता, शेततळे, जनावरांचा गोठा, जलतारा, विहीर पुनर्भरण, स्मशानभूमी शेड, अशी कामे करण्यात येत आहेत.
औसा तालुक्यातील ६६५ कामांवर ३९ हजार ५०४ मजूर कामांवर आहेत. अहमदपूर तालुक्यात ६४ कामांवर ४१८८, चाकुर तालुक्यात ११० कामांवर ३३९६, देवणी तालुक्यात १७६ कामांवर १२८२८, जळकोट तालुक्यात २५४ कामांवर १८५१०, लातूर तालुक्यात ८३७ कामांवर सर्वाधिक ४९३२२, निलंगा तालुक्यात २६६ कामांवर १५०२४, रेणापूर तालुक्यात ३०० कामांवर १९३०२, शिरुर अनंतपाळ तालुक्यात १५५ कामांवर ७४६२, उदगीर तालुक्यात ३७७ कामांवर २२८८२ असे एकुण ३२०४ कामांवर १, ९२ हजार ४१८ मजूर कामांवर आहेत.