सोलापूर : न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पण, डॉक्टरांना मनीषाशिवाय अन्य कोणाचा त्रास होता का?, त्यांना आत्महत्येच्या आणि आदल्या दिवशी कोणाकोणाचे कॉल आले होते किंवा त्यांनी कोणाला कॉल केले होते?, यासंदर्भातील माहिती ‘सीडीआर’मधूनच बाहेर येईल, अशी अपेक्षा होती. पण, पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या ७२० पानांच्या दोषारोपपत्रात ‘सीडीआर’च जोडला नसल्याची बाब समोर आली आहे.
परदेशवारीसाठी कोट्यवधींचे विमान खरेदी केलेले डॉ. वळसंगकर अनेक दिवसांपासून त्रस्त होते. आपल्या जवळच्या मित्रांना त्यांनी खासगीत काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येनंतर ‘आयएमए’तर्फे शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी अनेक डॉक्टरांनी मते व्यक्त केली होती. त्यातील कोणाचाही जबाब घेतल्याचे दोषारोपत्रात दिसत नाही. दरम्यान, आत्महत्येच्या दिवशी सायंकाळी साडेसहा व सव्वासात वाजता आपण आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे त्यांनी मुलगा डॉ. अश्विन यांना सांगितले होते. पण, त्या दिवशी डॉक्टरांनी अश्विन यांच्यासह अन्य कोणाला कॉल केले होते, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, या बाबी ‘सीडीआर’मधून बाहेर येऊ शकले असते. डॉक्टर वापरत असलेल्या मोबाईलचे सीडीआर काढल्याचेही त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते. मात्र, दोषापपत्रात ‘सीडीआर’ जोडलेला दिसत नाही, अशी माहिती मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी दिली.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी रूग्णालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत पुढील काळात वाडीया हॉस्पिटलमध्येच पूर्णवेळ लक्ष घालण्याचा निर्णय घेतला होता. स्वत:च्या रूग्णालयातील कामकाज सोडलेल्या डॉक्टरांनी आत्महत्येच्या चार महिन्यांपूर्वी रूग्णालयात लक्ष घातले होते. १७ एप्रिलला मनीषाने ई-मेल केला होता, त्यासंदर्भात त्या दिवशी रूग्णालयात मनीषाला बोलावून चर्चा झाली होती. दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनीषाविरूद्ध पोलिसांत जाणार होते, अशीही माहिती त्यावेळी समोर आली होती. तरीदेखील, १८ एप्रिलला डॉक्टरांनी आत्महत्या का केली, त्यांना मनीषाशिवाय अन्य कोणाचा त्रास होता, त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांनी काय सांगितले होते, आत्महत्येच्या दिवशी व आदल्या दिवशी त्यांनी कोणाकोणाला कॉल केले, त्यांना कोणाचे कॉल आले, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दोषारोपपत्र दाखल होऊनही अनुत्तरीतच आहेत.
सदर बझार पोलिसांनी डॉ. वळसंगकर आत्महत्येचा तपास पूर्ण करून ५८ दिवसांनी ७२० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले, पण त्यात अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांच्या तीन बँकांमधील तीन वर्षांच्या बँक स्टेटमेंटची ३४० पाने आहेत. याशिवाय सुमारे १०० पाने ७३ जणांच्या जबाबाची असून त्यात डॉक्टरांच्या स्वत:च्या रूग्णालयातील ४४ कर्मचारी असल्याचेही ॲड. नवगिरे यांनी सांगितले.