विनेश फोगट या भारताच्या जिगरबाज, लढाऊ आणि प्रतिकूलतेवर आपल्या जबरदस्त संघर्ष शक्तीने मात करणा-या कुस्तीपटूला सुवर्णपदकापर्यंत धडक मारल्यावर वजन जास्त असल्याच्या कारणाने तांत्रिक बाबीवरून स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आल्याने देशवासियांना प्रचंड मोठा धक्का बसणे व देश शोकसंतप्त होणे अत्यंत साहजिकच! बुधवारच्या दिवसभरात राजकीय नेत्यांपासून ते अगदी सामान्यातील सामान्यांच्या प्रतिक्रियांमधून या शोकभावनांचे व संतापाचे यथार्थ दर्शनही घडले. हातातोंडाशी आलेले सुवर्णपदक तांत्रिक कारणाने गमवावे लागणे हे धक्कादायकच! त्यामुळे ज्या विनेशसोबत हा प्रकार घडला तिच्याबाबत देशवासीय म्हणून आपल्याला हळहळ, करुणा, सहानुभूती, दु:ख, सहवेदना वाटणे अत्यंत साहजिकच. त्या तशा व्यक्त झाल्या, होत आहेत आणि होत राहतील. मात्र, शोकाच्या भावनेचा भर ओसरल्यानंतर हे असे का घडले याचे कारण शोधून झालेल्या चुकीतून धडा घेऊन भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी आपण दक्ष राहणार की, ऑलिम्पिकसारख्या जागतिक सर्वोच्च दर्जाच्या क्रीडा स्पर्धेच्या नियमांना व या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीच्या आग्रहालाच आरोपीच्या पिंज-यात उभे करणार? हा खरा प्रश्न आहे!
बुधवारचा घटनाक्रम व त्यानंतर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया पाहता आपली कुठे चूक झाली हे पाहण्यात वा शोधण्यात कुणाला स्वारस्य आहे, असे अजिबात जाणवत नाही. उलट ‘झाली चूक तर त्याकडे दुर्लक्ष करा’, असाच सूर प्रतिक्रियांमधून उमटतो. सध्या जमाना समाजमाध्यमी प्रतिक्रियांचा आहे. व या माध्यमाच्या मूलभूत प्रकृतीनुसार प्रतिक्रिया जेवढी आक्रमक व आक्रस्ताळी तेवढी ती खरी व दमदार समजण्याचा ‘ट्रेंड’ आहे. त्यामुळे काही जणांचे ऑलिम्पिक स्पर्धेच्या नियमांचा शिवराळ उद्धार करूनही समाधान झाले नाही. नियम बदलून विनेशच्या चुकीकडे दुर्लक्ष न केले गेल्यास भारताने या स्पर्धेवर बहिष्कार घालावा, अशी मागणी करण्यापर्यंत काहींची मजल गेली. राजकारण तर भारतीयांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. त्यामुळे अशा घटनेवर राजकारण्यांनी आपले राजकीय हिशेब पूर्ण करण्याची संधी सोडली तर ते नवलच! त्यामुळे संसदेपासून रस्त्यापर्यंत असे हिशेब चुकते करण्याची अहमहमिका सुरू झाली आहे व ती बराच काळ चालत राहणार हे ही ओघाने आलेच! विनेशने कुस्तीगिरांच्या आंदोलनात सर्वांत पुढे राहून विरोध दर्शविला होता. त्यामुळे तिचा असा व्यवस्थित काटा काढला गेला इथवर आरोप झाले व हे कोणाच्या इशा-यावर घडवले गेले? असा सवालही उपस्थित झाला.
अर्थात आपल्या देशात हे अजिबात अनपेक्षित नाही कारण सहानुभूती व राजकीय डाव या दोन भावनांच्या हिंदोळ्यावर जगण्याची आपल्याला सवय झाली आहे. त्यामुळे जे सत्य शोधण्यासाठी वास्तवाची चिकित्सा आवश्यक असते त्याकडे कायम आपली पाठ असते! ते कसे? याची याच स्पर्धेच्या इतिहासातील ही काही उदाहरणे. २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी विनेश फोगटला ४०० ग्रॅम वजन जास्त असल्याने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले होते. बबिता फोगट याच कारणामुळे २०१२च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून बाद ठरली होती. १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत पप्पू यादव यांनाही वजन जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. केवळ कुस्ती प्रकारातच नाही तर इतर क्रीडा प्रकार व व्यवस्थापनातही आपण असे पराक्रम केलेले आहेत. २०१७ च्या आशियाई स्पर्धेत धावताना धावपटूंनी आपली ‘लेन’ बदलल्याने संपूर्ण संघच स्पर्धेतून बाद झाला. २०१९ साली आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत भारतीय संघ आपल्या महामंडळाच्या दिव्य कारभाराने वेळेवर पोहोचूच शकला नाही. २०१८च्या जकार्ता आशिया स्पर्धेच्या उद्घाटनात भारतीय ध्वजवाहकांची फजिती झाली. गेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कमलप्रीत कौर अशाच तांत्रिक कारणाने अपात्र ठरली.
सध्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष असणा-या पी.टी. उषा १९९८ सालच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खिळ्याचे बूट घालून धावल्या होत्या. २०१६ साली द्युती चंदनकडूनही असाच प्रमाद घडला होता. २००० सालच्या स्पर्धेत सीमा पुनिया तांत्रिक कारणामुळे स्पर्धेतून बाद झाली. तर कधी आपला खेळाडू खोकल्याचे औषध घेतल्याने बाद होतो, तर कधी जे खाऊ नये ते खाल्ल्याने स्पर्धेबाहेर होतो. अशी आणखी बरीच उदाहरणे देता येतील! सांगायचा मूळ मुद्दा हा की, अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होताना या स्पर्धांचे नियम आपल्याला माहीत नसतात असे समर्थन होऊच शकत नाही. विनेशची ही काही पहिली ऑलिम्पिक स्पर्धा नव्हती.
तिला स्पर्धेचे नियम माहिती होतेच. इतरवेळी ५३ किलो वजन गटात ती खेळत असताना या स्पर्धेत ती ५० किलो वजन गटात स्पर्धेत उतरली होती. त्यामुळे वजनावर काटेकोर नियंत्रण हवे हे तिला पक्के माहिती होते. म्हणून तर विनेशने तिला आवश्यक प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांचा आग्रह धरला होता व तिच्याकडून पदकाची मोठी अपेक्षा असल्याने तिचा हा आग्रह पूर्णही करण्यात आला होता. विनेशसोबत तिच्या वैयक्तिक प्रशिक्षक बल्गेरियाच्या वूलर अकोस होत्या. असे असतानाही उपान्त्य फेरीचा सामना जिंकल्यानंतर विनेशचे वजन तब्बल दोन किलोने वाढू देण्याची चूक घडली. ती का? याची कारणमीमांसा वेगळा स्वतंत्र विषय आहे. मात्र, वजन वाढल्याचे निदर्शनास आल्यावर ते कमी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यातून विनेशने रात्रीतून एक किलो ९०० ग्रॅम वजन घटवलेही. केस कापणे, कपडे छोटे करणे अगदी रक्त काढणे असेही प्रयत्न झाले.
मात्र, तरीही तिचे वजन १०० ग्रॅम जास्त भरले. त्यामुळे ती अपात्र ठरली. तिच्याबद्दल सहानुभूती वाटणे, हळहळ वाटणे साहजिकच! मात्र, त्यापोटी ऑलिम्पिकच्या नियमांना दोष देण्यात कोणता शहाणपणा? मुळात विनेशचे नियमित वजन ५५ ते ५६ किलो आहे. ती ३ किलो वजन घटवून ५३ किलो वजन गटात यापूर्वी खेळली. या स्पर्धेत ती ५० किलो वजन गटात उतरली म्हणजे तिला नियमित वजनापेक्षा ६ किलो वजन कमी ठेवायचे होते. सलग तीन लढतीनंतर अंतिम फेरीसाठी ताकद प्राप्त करण्यासाठी विनेशला पाणी आणि एनर्जी फूड देणे भाग होते. ते दिल्याने तिचे वजन वाढले. वाढलेले वजन कमी करण्यासाठी जो आवश्यक वेळ हवा तो कमी पडला म्हणून सर्व प्रयत्नांनंतरही तिचे वजन १०० ग्रॅम जास्त भरले! या ‘फक्त १०० ग्रॅम’ वरून आता गदारोळ होतोय!
१०० ग्रॅम जास्त वजन गोड मानून घ्यायला हवे ही आपली अपेक्षा. मात्र, त्याचवेळी ५६ किलो नियमित वजन असणा-या विनेशने ५० किलो वजन गटात स्पर्धेत उतरण्याचा धोका पत्करला व आपल्या सर्व तज्ज्ञांनी तिला तो स्वीकारू दिला, ही चूक नाही काय? या चुकीची जी फळे पदरात पडायची ती पडणे अटळच होते. मात्र, त्यातून योग्य धडा घेण्याऐवजी जर आपण आपल्या खेळाडूच्या प्रेमापोटी स्पर्धेच्या नियमांना व त्याच्या काटेकोर अंमलबजावणीलाच बोल लावणार असू तर आजही आपण ‘ये रे माझ्या मागल्या’ मानसिकतेतच गुरफटलो आहोत हेच स्पष्ट होते. जर ही मानसिकता बदलणार नसेल तर मग देशाच्या खेळाडूंकडून जागतिक स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरीची व पदक प्राप्तीची अपेक्षा ठेवण्यात काय हाशिल?