बीड : प्रतिनिधी
बीड शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस चालक आणि शिक्षकाने एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ केल्याचा प्रकार दोन दिवसापुर्वी उघडकीस आला. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून बीडमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींचा संबंध बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी असल्याचा आरोप त्यांचे बंधू योगेश क्षीरसागर आणि आता आमदार धनंजय मुंडे यांनीही केला.
२९ जून रोजी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. या संदर्भात विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती व निवेदन त्यांना दिले. महिला आयपीएस अधिका-याच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमूण या गंभीर प्रकरणाची चौकशी करावी, आरोपींशी आमदाराचे असलेले कनेक्शन, घटना घडली त्याच दिवशी आमदारांची तिथे असलेली उपस्थिती व इतर गोष्टींचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.
हे प्रकरण आता फक्त पोलीस तपासापुरते मर्यादित राहिलेले नाही. यामध्ये कोणाचे राजकीय संबंध आहेत, घटना घडल्यानंतर कोण कोणाला भेटले, त्यांच्यात काय बोलणे झाले, फोनवरून काय चर्चा झाली या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या पाहिजे. त्यासाठी सीडीआरच नाही तर आईपीआरही तपासला पाहिजे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षभरापासून कोचिंग क्लासचा मालक आणि त्याचा पार्टनर त्या विद्यार्थीनीचा लैगिंक छळ करत होते. या मुलीचे कुटुंब भेदरले होते, आपल कोणी ऐकले का? कस बोलावे या विवंचनेत असताना या कुटुंबाच्या मनात आत्महत्येचा विचार आला. हे जेव्हा त्या मुलीला कळाले, तेव्हा तीने हिंमत दाखवून तक्रार दाखल केली. या प्रकरणातील आरोपांना कोणाचे राजकीय पाठबळ आहे. स्थानिक आमदार राहतात ते घर कोणाच्या मालकीचे आहे? याचा शोध पत्रकार म्हणून आपणही घेतला पाहिजे.