जळकोट : प्रतिनिधी
धामणगाव ता. जळकोट येथील धनलक्ष्मी महिला शेतकरी गटाने सामूहिक शेतीचा आदर्श निर्माण करत पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने कोळपणीचे काम हाती घेतले आहे. दि. १९ जुलै २०२६ रोजी गटातील महिलांनी एकमेकांच्या शेतात (पारंपरिक) पद्धतीने बैलांच्या सहाय्याने कोळपणी करीत अवघ्या एका दिवसात ५ एकर क्षेत्राची कोळपणी पूर्ण केली.
या उपक्रमात गटाच्या निमंत्रक सौ. सीमा शामराव आगलावे यांच्यासह वर्षा नरसिंग आगलावे, सीमा मारोती आगलावे, पार्वती गोविंद आगलावे, सुरेखा सुरेश आगलावे, सरस्वती अर्जुन आगलावे, छाया मारोती मोटे, लक्ष्मीबाई भागवत मोटे, पौर्णिमा दत्ता सोनकांबळे आणि पुष्पा दिगांबर आगलावे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गटशेतीच्या माध्यमातून सामूहिकरीत्या कोळपणी केल्यामुळे मजुरीवरील खर्चात मोठी बचत झाली असून कामही कमी वेळेत पूर्ण झाले आहे. त्यामुळे आर्थिक बचतीबरोबरच शेतीची कामेही वेळेत पूर्ण करण्यास मदत होत असल्याचे गटातील महिलांनी सांगितले.
विशेष म्हणजे या उपक्रमात महिलांसोबत गावातील पुरुषांनीही कोळपणीच्या कामात सहभाग नोंदवत सहकार्य केले. सामूहिक श्रम आणि परस्पर सहकार्याच्या बळावर धनलक्ष्मी महिला शेतकरी गटाने अवघ्या तीन दिवसांत तब्बल १५ एकर क्षेत्राची कोळपणी पूर्ण केली असून, गटशेतीचा हा उपक्रम परिसरातील इतर शेतक-यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे
















