सेलू : (दिलीप डासाळकर)
येथील श्री केशवराज बाबासाहेब संस्थानमधील अनियमितता व बेकायदेशीर कामासंदर्भात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात सुनावणी पार पडली. यावेळी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे गैरव्यवहार संदर्भातील सर्व पुरावे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यामुळे बाबासाहेब संस्थानमध्ये ज्यांनी बेकायदेशीर केलेली आहेत त्या सर्व सदस्यांचे धाबे दणाणले आहे.
या प्रकरणासंदर्भात २०२२मध्ये धर्मदाय अधिकारी यांच्याकडे सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांनी तक्रार दिली होती. मात्र तक्रार देऊन ४ वर्षे झाले तरीही कुठलीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे डासाळकर यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वरीष्ठ कार्यालय छ. संभाजीनगर यांच्याकडे तक्रार केली होती. संस्थानच्या सेलू आणि परिसरात असलेल्या मोठ्या मालमत्ता आहेत. त्या मालमत्तांची विल्हेवाट लावलेली असून दत्तनगर परिसरातील जमिनीचे बेकायदेशीर भूखंड करून विक्री केले असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच संस्थानच्या मंदिरासमोर १० व्यावसायिक दुकाने बांधून बेकायदेशीररित्या विक्री केल्याचे म्हटले आहे. विशेषत: श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिराच्या जागेवर देखील कब्जा करण्याचा प्रयत्न केला असून त्या जागेवर स्वत:चे नाव देखील टाकण्यात आलेले आहे. तसेच संस्थानची रवळगाव येथील असलेली जमीन व त्या जमिनीच्या सातबारावर देखील विश्वस्त म्हणून काही पदाधिका-यांनी स्वत:ची नावे देखील टाकली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वास्तविकत: सदरील संस्थान हे धर्मदाय कार्यालयाच्या अंतर्गत असून या कार्यालयामार्फत जी कार्यकारणी नेमण्यात येते त्या कार्यकारिणीस समांतर अशी बेकायदेशीर कार्यकारिणी नेमून त्या मार्फत देवस्थानला व संस्थानच्या मालमत्तेचे नुकसान केलेले आहे. याशिवाय मंदिराला पैसा लावण्याऐवजी स्वत:चा आर्थिक लाभ काही विश्वस्तांनी केला असल्याच्या आरोपाची सर्व पुरावे धर्मदाय आयुक्त कार्यालय यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. त्यामुळे श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थानमधील बेकायदेशीर कामांची चौकशी होवून कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
विश्वस्तांना कार्यमुक्त करण्याची मागणी
केशवराज बाबासाहेब संस्थानची फसवणूक करणा-या तसेच जुगार खेळताना पकडल्या गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सभासदांना या कार्यकारीणीतून वगळण्यात यावे. बेकायदेशीर यात्रा कमिटीमधून डिसेंबर महिन्यात होणा-या यात्रा महोत्सवात लाखो रुपयाचा आर्थिक भ्रष्टाचार करणा-या विश्वस्तांना कार्यमुक्त करावे. तसेच संबंधितावर कार्यवाही करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालय अथवा वरिष्ठ न्यायालयामध्ये देखील याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
















