वाहतूक ठप्प, तब्बल ४७ कि. मी. अंतरापर्यंत वाहने अडकली
धाराशिव : प्रतिनिधी
येरमाळ््यात शुक्रवारी येडेश्वरीदेवीचा चैत्री पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्ताने येडेश्वरीच्या दर्शनासाठी १५ लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती. दुपारच्यानंतर भाविक परतीच्या प्रवासाला लागताच वाहतुकीचे ढिसाळ नियोजन केल्याने येरमाळ््यात धुळे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली. वाहने रस्त्यावरच अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दुपारपासूनच महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. तब्बल ७ तासांपेक्षा जास्तवेळ वाहने जागेवरच थांबल्याने जवळपास ४७ कि.मी. अंतरापर्यंत वाहने अडकली. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
राज्याच्या कानाकोप-यातून आज लाखो भाविकांनी येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. तसेच लाखो भाविक पालखी सोहळ््यात सहभागी झाले होते. दुपारी पालखी सोहळा पार पडताच लाखो भाविक परतीच्या प्रवासाला लागले. त्यामुळे वाहतूक कोंडी चांगलीच झाली. वाहने अडकल्याने अडकलेल्या गाड्यांमधील लोकांना १० ते १५ कि.मी. चालत जावे लागले. या वाहतूक कोंडीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटीलही ४ ते ५ तास अडकून राहिले. ७ तासांपेक्षा जास्तवेळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेनिमित्त २ आणि ३ एप्रिल रोजी भरवली होती. या यात्रेमुळे देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी येरमाळ््यात हजेरी लावली होती. यावेळी पालखी सोहळ््यादरम्यान, पालखीवर हेलिकॉप्टरने फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी लाखो भाविकांच्या गर्दीने आणि देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
अनेकांवर पायपीट
करण्याची वेळ
महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अनेक प्रवाशांना १० ते १५ कि.मी. अंतरापर्यंत पायपीट करावी लागली. विशेष म्हणजे उन्हाचा कडाका सुरू असताना प्रवाशांची खूप तारांबळ उडाली. आमदार पाटीलही ४ ते ५ तास वाहतूक कोंडीत अडकले होते. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

