नंदुरबार : प्रतिनिधी
जिल्ह्याचे पोल्ट्री हब मानल्या जाणा-या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी नंदुरबारच्या नवापूरमध्ये सहा पोल्ट्री फार्ममधील दीडशे ते दोनशे कोंबड्या अचानक मरण पावल्या होत्या. त्यामुळे पोल्ट्री फार्म मालकांनी थेट पशुसंवर्धन विभागात धाव घेतली. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी तपास करत संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळमधल्या वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
त्यानंतर मिळालेल्या अहवालात नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे समोर आले. आता १ किलोमीटर परिसरात प्रशासनाकडून पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्यांची किलिंग प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रक्रियेत संसर्ग झालेल्या कोंबड्यांना सामूहिकरीत्या नष्ट केले जाणार आहे. दुसरीकडे बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह येताच जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले आहे. किलिंग प्रक्रियेत सहकार्य न करणा-या पोल्ट्री फार्म संचालकांवर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले आहे.
















