धुळे : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपने गुलाल उधळला आहे. भाजपचा पहिला नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आला आहे. खान्देशात भाजपाने विजयी सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपने धुळे जिल्ह्यामध्ये खाते उघडले आहे.
दोंडाईचा पालिकेत नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपाच्या बाजूने लागला आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. नयनकुवर रावल या राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री आहेत. त्या भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार होत्या.
रावल यांच्यासह भाजपचे आणखी सात नगरसेवकही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीत भाजपला वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले आहे. नयनकुवर रावल यांच्या विरोधातील उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने रावल यांची बिनविरोध निवड झाली.
भावसार यांनी दोंडाईचा नगर परिषदेचा मालमत्ता कर थकवल्याच्या मुद्यावरून भाजपाचे डॉ. रवींद्र देशमुख यांनी हरकत घेतली होती. त्यावर निवडणूक अधिका-यांकडे सुनावणी घेण्यात आली.
निवडणूक अधिका-यांसमोर शरयू भावसार यांनी आपली बाजू मांडली, भावसार यांचा अर्ज बाद करण्यात आला. निकाल हा भाजपच्या बाजूने लागला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. छाननीत भावसार यांचा अर्ज बाद झाल्याने रावल यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिकता फक्त बाकी राहिली आहे.

