लातूर : प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना मनपाच्या वतीने पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी पिवळसर दिसत असले तरी ते पिण्यायोग्य असल्याचा निर्वाळा तज्ञांनी दिला आहे. या पाण्याची दैनंदिन तपासणी केली जात असून बुधवारी मनपा पदाधिकारी व अधिका-यांच्या उपस्थितीत तज्ज्ञांनी या पाण्याची तपासणी केली असल्याची माहिती लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.
धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून लातूरसाठी पाणी उचलण्यात येते. सध्या पाटबंधारे विभागाकडून कॅनलद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणी ढवळले जात आहे. परिणामी पाण्याच्या तळाशी साठलेला गाळ, सेंद्रिय घटक व शेवाळ पाण्यात मिसळून त्याला पिवळसर रंग येत आहे. धरणातील पाणीपातळी घटलेली असून वाढत्या तापमानामुळे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे सूक्ष्म सेंद्रिय घटकांची वाढ अधिक प्रमाणात होत आहे. हे पाणी शुद्धीकरण करताना क्लोरीनच्या संपर्कात आल्यानंतर रासायनिक अभिक्रियांमुळे त्याचा रंग किंचित पिवळसर दिसतो. ही घटना नैसर्गिक असून त्याचा पाण्याचा गुणवत्तेवर घातक परिणाम होत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.
जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून या पाण्याची दैनंदिन तपासणी केली जात आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार हे पाणी पिण्यास योग्य आहे, असेही मनपाच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी उकळून, गाळून व थंड करून वापरावे. पाण्याचा पिवळसरपणा कमी करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रक्रियेत ब्लिचिंग पावडर, तुरटी याचा नियंत्रित वापर करावा. प्रभावी ऑक्सिडेशन व निर्जंतुकी करणासाठी क्लोरीन डाय-ऑक्साइड वापरावे, असेही सांगण्यात आले आहे.बुधवारी महापौर जयश्रीताई सोनकांबळे, आयुक्त श्रीमती मानसी, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, सभागृह नेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, नगरसेवक किरण जाधव, युनुस मोमीन, कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण, जिल्हा प्रयोगशाळा तज्ज्ञ अजित पवार यांनी हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली. तांत्रिक तज्ज्ञ यांना बोलावून माहिती घेतली. तांत्रिक बाबी समजून घेतल्या. उपाययोजनाबाबत चर्चाही केल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली.

