21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रनवनीत राणांच्या सभेत राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

नवनीत राणांच्या सभेत राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

अमरावती : प्रतिनिधी
दर्यापूर विधानसभा मतदारसंघात येणा-या खल्लार गावात नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत शनिवारी रात्री राडा झाला. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार अरुण बुंदिले यांच्या प्रचारासाठी आयोजित भाजपाच्या नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत काही युवकांनी गोंधळ निर्माण केला. या युवकांनी सभेच्या ठिकाणावरील खुर्च्या मंचाच्या दिशेने भिरकवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

खल्लार गावात रात्री आठ वाजण्याच्या सुमाराला माजी खासदार नवनीत राणा या अरुण बुंदिले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आल्यानंतर काही युवकांनी उपद्रव करण्यास सुरुवात केली. सभा सुरू झाल्यावर उपस्थित ३० ते ४० युवकांनी राणांचे भाषण सुरू असताना मध्येच ओरडणे, काहीतरी बोलणे असा प्रकार सुरू केला. नवनीत राणा यांनी भाषणाला सुरुवात केली असताना काही युवकांकडून विचित्र अशा कमेंट्स पास केल्या जात होत्या. काही वेळातच या युवकांनी खुर्चीवरून उठून आपल्या जवळची खुर्ची चक्क मंचाच्या दिशेने भिरकवण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे सभास्थळी गोंधळ उडाला.

नवनीत राणांचा पोलिस ठाण्यात ठिय्या-
युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार अरुण बुंदिले यांच्या प्रचार सभेत काही युवकांनी धुडगूस घातल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यावेळी खुर्ची लागल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. या संपूर्ण प्रकरणामुळे गावात तणाव निर्माण झाला. नवनीत राणा यांनी खल्लार पोलिस ठाणे गाठून झाल्या प्रकाराबाबत कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी काही मंडळींनी या सर्व प्रकरणामागे तीन जण आहेत, असे सांगितले. त्या तिघांना अटक होईपर्यंत पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडणार, अशी भूमिका घेतली. रात्री दीड वाजता माजी खासदार नवनीत राणा या अनेक कार्यकर्त्यांसह खल्लार पोलिस ठाण्यात पोहोचल्या. यावेळी खल्लार पोलिस ठाण्यात आणि पोलिस ठाण्यासमोर शेकडो कार्यकर्ते जमा झाले.

हा नियोजित कट : नवनीत राणा
खल्लार येथील प्रचार सभेत घडलेला प्रकार निंदनीय आहे. विशिष्ट समुदायातील युवकांनी माझ्यावर हल्ला केल्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरणारी नाही. माझा प्रचार मी सुरूच ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली. पुढे राणा म्हणाल्या, आमची शांततेने प्रचारसभा सुरू होती. युवकांकडून घाणेरडे इशारे सुरू होते. ताईंना काही बोलू नका, थोड्याच वेळात जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. मला मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी खुर्च्या फेकल्याने सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR