अमरावती : प्रतिनिधी
भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना समाज माध्यमावरून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणा-या तरुणाला पकडण्यात अमरावती पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे मागोवा घेत गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला छत्तीसगडमधील भिलाई येथून ताब्यात घेतले. त्याला सहकार्य करणा-या इतर चार जणांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
शेख इसा शेख मुसा (२८, रा. पथ्रोट, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख इसा याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा भाऊ शेख मुस्ताक शेख मुसा (३२, रा. पथ्रोट), मोहम्मद जाकीर शेख हसन (३७, रा. अंजनगाव सुर्जी), तसेच आरोपीला अंजनगाव येथून मालवाहू वाहनातून भिलाई येथे घेऊन जाणारा एजाज खान अहमद खान (२४, रा. पथ्रोट) आणि जुबेर सुलतान सौदागर (२१, रा. तरोडा रिद्धपूर) यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवनीत राणा यांना इन्स्टाग्राम खात्यावरून अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी इसाभाई या सोशल मीडियाच्या वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

