नवी मुंबई : मुदत संपलेले खाद्यपदार्थ फेकून न देता, त्यांच्यावर नवीन तारखा छापून ते बाजारात विकणा-या एका मोठ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तुर्भे परिसरातील एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात तब्बल ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत दररोजच्या वापरातील अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थांचा साठा सापडला आहे. यात नामांकित कंपन्यांचे वेफर्स, पोटॅटो चिप्स, नूडल्स, सूप, मायोनिज चे पॅकेट्स आणि नामांकित ब्रँड्सच्या शीतपेयांच्या कॅन्सचा समावेश आहे. हा सर्व माल ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळणारा होता.
कारवाईदरम्यान अधिका-यांना या ठिकाणी अतिशय धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील मूळ उत्पादन तारीख आणि मुदत संपण्याची तारीख केमिकलच्या साहाय्याने पुसून टाकली जायची. त्यानंतर त्यावर नवीन तारखा छापून किंवा मूळ माहितीवर नवीन स्टिकर्स लावून मुदत संपलेला माल पुन्हा बाजारात विक्रीसाठी तयार केला जात होता.
एफडीए आणि नवी मुंबई गुन्हे शाखेने २४ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या काळात ही संयुक्त मोहीम राबवली. तुर्भे येथील ‘मेसर्स साधना एंटरप्रायझेस’ या ठिकाणी हा बेकायदेशीर धंदा सुरू होता.
मुंबई, नवी दिल्ली आणि नोएडा येथील सुमारे १० प्रमुख निर्यातदार कंपन्यांशी संबंधित उत्पादनांचे लेबल्स बदलण्याचे आणि रिपॅकिंगचे काम येथे चालू होते. या छाप्यात प्रशासनाने ७५ लाख २१ हजार २६९ रुपये किमतीचे ४,९४२ कार्टून्स (खोके) जप्त केले आहेत. याशिवाय, १ लाख ३० हजार ६०० रुपयांचा विनालेबलचा आणि मुदत संपलेला मालही हस्तगत केला आहे. आवश्यक एफएसएसएआय परवाना आणि खरेदीची बिले नसल्यामुळे काही उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच या पेढीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
















