भारतीय पुरुष क्रिकेटच्या इतिहासाकडे नजर टाकल्यास महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या यशस्वी कालखंडानंतर आज संघ ज्याप्रमाणे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नव्या दिशेने वाटचाल करत आहे, अगदी तशाच एका ऐतिहासिक वळणावर आज भारतीय महिला क्रिकेट उभे राहिले आहे. प्रदीर्घ काळ संघाचा आधारवड ठरलेल्या मिताली राज आणि त्यानंतर देशाला विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवून देणा-या हरमनप्रीत कौर यांच्यानंतर आता भारतीय महिला संघाची धुरा स्मृती मंधाना हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. भारताचे नेतृत्व स्वीकारणे हे स्मृतीसाठी केवळ पद नसून हरमनप्रीतने जागतिक शिखरावर पोहोचवलेली समृद्ध परंपरा पुढे नेण्याची एक अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक जबाबदारी आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्मृती मंधाना ही आजवर आपल्या दर्जेदार आणि तडफदार फलंदाजीच्या बळावर जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारी आघाडीची खेळाडू राहिली आहे; मात्र आता तिच्या खांद्यावर केवळ धावा उभारण्याचे काम नसून संपूर्ण संघाचे सारथ्य करण्याचे मोठे दायित्व आले आहे. क्रिकेट विश्वात कर्णधारपद म्हणजे केवळ मैदानावर नाणेफेक करणे किंवा गोलंदाजांमध्ये बदल करणे नव्हे तर आधीच्या पिढीने कठोर परिश्रमाने, धाडसी निर्णयांनी आणि अद्वितीय कामगिरीने निर्माण केलेला वारसा तितक्याच आत्मविश्वासाने पुढे नेणे असते. स्मृतीसमोर आता मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी रचलेला हाच वारसा जपण्याचे आणि त्याला नव्या उंचीवर नेण्याचे मोठे आव्हान असणार आहे. भारतीय पुरुष क्रिकेटमध्ये ही परंपरा समजून घेण्यासाठी कपिल देव, सौरव गांगुली यांच्यापासून ते महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या योगदानाकडे पाहावे लागते. कपिल देव यांनी भारतीय संघाला जागतिक पातळीवरील मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास दिला.
सौरव गांगुली यांनी नव्या खेळाडूंवर अतूट विश्वास दाखवत आक्रमक वृत्तीने लढायला शिकवले. धोनीने हा वारसा आणखी पुढे नेऊन आपल्या शांत आणि अचूक नेतृत्वाखाली भारताला २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. दबावाच्या क्षणी स्वत:च्या निर्णयांवर ठाम राहणारा संघ धोनीने घडवला त्यानंतर विराट कोहलीने नेतृत्वाची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकली. आक्रमकता, खेळाडूंची सर्वोच्च शारीरिक तंदुरूस्ती आणि कसोटी सामन्यांमध्ये मिळवलेला निर्विवाद विजय ही कोहलीच्या कार्यकाळाची मुख्य वैशिष्ट्ये ठरली. कोणत्याही परदेशी भूमीवर जाऊन तिथल्याच अटींवर विजय खेचून आणण्याची मानसिकता विराटने खेळाडूंमध्ये निर्माण केली. भारतीय संघ केवळ घरच्या मैदानावरच नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठेही जिंकू शकतो, हा अभेद्य आत्मविश्वास त्याच्या काळात दृढ झाला. पुढे रोहित शर्माने या परंपरेला आयसीसीच्या मोठ्या विजेतेपदांची जोड दिली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. अत्यंत संयमी स्वभाव, अनुभवी खेळाडूंना दिलेले स्वातंत्र्य आणि मोठ्या सामन्यांतील अचूक रणनिती हे रोहितच्या यशाचे गमक राहिले. आज गिल ज्याप्रमाणे या दिग्गजांची परंपरा पुढे नेत आहे त्याचप्रमाणे महिला क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय महिला क्रिकेटच्या प्रवासाची पार्श्वभूमी आणि संघर्ष मात्र अत्यंत खडतर राहिला आहे. मिताली राज यांचा कालखंड हा भारतीय महिला क्रिकेटसाठी मजबूत पायाभरणी करणारा ठरला. त्यांनी अनेक वर्षे संघाचे समर्थपणे नेतृत्व केले आणि आपल्या सातत्यपूर्ण, संयमी फलंदाजीने महिला क्रिकेटला जागतिक पटलावर मानाचे स्थान मिळवून दिले. मितालीच्या नेतृत्वाखाली भारताने २००५ आणि २०१७ अशा २ वेळा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. अंतिम सामन्यात विजेतेपद हुकले असले तरी देशभरात महिला क्रिकेटविषयी प्रचंड आदर आणि उत्सुकता निर्माण करण्यात मितालीच्या संघाने मोलाची भूमिका बजावली.
मिताली राज यांच्यानंतर हरमनप्रीत कौरने भारतीय संघाला निडर आणि आक्रमक ओळख मिळवून दिली. मोठ्या सामन्यांमध्ये स्वत: पुढाकार घेऊन जोखीम पत्करणारी आणि दबावाच्या क्षणी संघाला पुढे नेणारी कर्णधार म्हणून हरमनप्रीतने स्वत:चा दबदबा निर्माण केला. तिच्याच धडाकेबाज नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने २०२५ मध्ये अखेर एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावून इतिहास रचला. ज्या यशाची पायाभरणी वर्षांपूर्वी मितालीने केली होती त्यावर विश्वविजेतेपदाचा सुवर्ण कळस चढवण्याचे काम हरमनप्रीतने केले. हरमनप्रीतच्या कर्णधार पदाचे महत्त्व केवळ विजयाच्या आकडेवारीत मोजता येणार नाही तर बलाढ्य संघांना डोळ्यात डोळे घालून भिडण्याचा जो आत्मविश्वास तिने दिला तो भारतीय महिला क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारा ठरला.
आता ही समृद्ध धुरा स्मृती मंधानाकडे आली आहे. तिच्या हाताखाली असा संघ आहे. ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभवही आहे आणि नवोदित प्रतिभावान खेळाडूंची मोठी फळीही सज्ज आहे. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून स्मृतीने आपल्या फलंदाजीने सातत्याने छाप पाडली आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली तिने बरीच वर्षे उपकर्णधार पदाची धुरा सांभाळल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रणनिती आखण्याचा दांडगा अनुभव तिच्या गाठीशी आहे शिवाय, महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करताना तिने २०२४ आणि २०२६ या दोन्ही मोसमांत विजेतेपद पटकावून आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक दाखवून दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अपेक्षांचे ओझे आणि फ्रेंचायझी क्रिकेटचा दबाव यात फरक असला तरी कठीण परिस्थितीत मोठ्या खेळाडूंना सोबत घेऊन निकाल देण्याची कला तिच्याकडे आहे, हे तिने सिद्ध केले आहे.
स्मृतीची नेतृत्वशैली हरमनप्रीतपेक्षा ब-याच अंशी वेगळी असेल. हरमनप्रीत मैदानावर आपल्या प्रखर आक्रमकतेसाठी ओळखली जात असे तर स्मृतीचा शांत, संयमी स्वभाव आणि फलंदाजीतील सहजता ही तिच्या कर्णधार पदाची खरी ओळख ठरेल. अर्थात, कर्णधाराची खरी कसोटी त्याच्या स्वभावापेक्षा कठीण प्रसंगात संघ कशी कामगिरी करतो यावर लागत असते. स्वत:च्या दर्जेदार फलंदाजीचा स्तर कायम राखत कर्णधार पदाच्या जबाबदा-या लीलया पेलणे हे तिच्या समोरील प्राथमिक आव्हान असेल. स्मृती मंधानाच्या पूर्णवेळ कर्णधार पदाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी मालिकेने होत आहे. या दौ-यात ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० मालिकेला १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून एकदिवसीय मालिका २३ ऑक्टोबरपासून सुरू होईल. मितालीने पाया रचला, हरमनप्रीतने देशाला विश्वविजेते केले आणि आता स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली हा प्रवास कोणत्या नव्या शिखरांना गवसणी घालतो, याकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे डोळे लागले आहेत.
-अंजली महाजन
















