लातूर : प्रतिनिधी
सोलापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटी ता. चाकूर येथे मोटारसायकलस्वाराला वाचविण्यात भरधाव वेगातील एसटी पलटी झाल्यामुळे बस मधील जवळपास ४१ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.४० वाजता घडली होती. यात काही प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले आहेत तर बरेच जण जखमी झाले असून याच ठिकाणी महिनाभरापुर्वी कालच्या घटने प्रमाणेच दुचाकीस्वार रस्ता ओलांडत असताना कार व दुचाकीचा अपघात झाल्याचे आता सीसीटिव्ही फुटेज मधून समोर येत आहे. सदरील इिकाण अपघात प्रवण क्षेत्र बनले असून सदरील ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने याला गांर्भियाने घेत उपाययोजना कराव्यात अशी मागणी या परिसरातील नागरीकांतून केली जात आहे.
सोलापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चाकूर तालुक्यातील टोलप्लाझा पासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या नांदगाव पाटी येथे सोमवार रोजी अहमदपूर ते लातूर ही बस चाकूर येथून प्रवाशी घेऊन लातूरच्या दिशेने निघाली असता नांदगावपाटी जवळ एक मोटारसायकलस्वार अचनाकपणे उजव्या बाजूला वळत असल्याचे लक्षात येताच पाठीमागून येणा-या एम. एच. २० बी. एल. १६१३ क्रमांकाच्या बस चालकाने मोटारसायकलस्वाराला वाचविण्यासाठी एसटी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्यामुळे बस दुभाजकाला घडकून विरूध्द बाजूला पलटी झाली होती. या घटनेत अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर आता याच ठिकाणी महिनाभरापुर्वी दि. ४ फेब्रुवारी रोजी याच प्रमाणे कार व दुचाकीचा अपघात झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून दि. ४ फेबुवारी रोजी एक भरधाव कार लातूरच्या दिशेन येत असताना त्याच दरम्यान एक दुचाकीस्वार कालच्या अपघातातील दुचाकीस्वारा प्रमाणे रस्ता ओलांडत असताना दुचाकी व कारची जोरात घडक झाली व कार व दुचाकी ही बाजुला फेकल्याचे दिसून येत आहे. या अपघातात चाकूर तालुक्यातील अंबुलगा येथील पशुवैद्यकीय डॉ. यशवंत गरड यांना जीव ही गमवावा लागल्याचे समोर येत आहे. तसेच सदरील ठिकाणी अशा वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचे ही सांगितले जात आहेत. एकंदरीत पाहता नांदगाव पाटी हे या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवणक्षेत्र बनले असून सदरील ठिकाणीराष्ट्रीय महामार्ग विभागाने याला गांर्भियाने घेत उपाययोजना कराव्यात अशी मागणी या परिसरातील नागरीकांतून केली जात आहे.