Homeनांदेडनांदेडमध्ये गँगवॉर, तिहेरी हत्याकांड

नांदेडमध्ये गँगवॉर, तिहेरी हत्याकांड

रस्त्यावर एकाला, रुग्णालयात दोघांना संपविले, जिल्हा हादरला
नांदेड : प्रतिनिधी
नांदेड शहरात शुक्रवारी मध्यरात्री गँगवारचा थरार घडला. या गँगवॉरमधून तिहेरी हत्याकांडाची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका गँगमधील एकाची रस्त्यावर घेरून हत्या करण्यात आली तर मयत युवकाच्या भावाने दुस-या गँगमधील जखमी दोघांची खून का बदला खून म्हणत शासकीय रूग्णालयात जाऊन चाकूने वार करून हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने नांदेड जिल्हा हादरला.

याबाबत मिळालेली माहिती अशी, डी मार्ट तथा कॅनॉल रोडवरील ई-स्क्वेअरच्या बाजूला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन गँगमध्ये वर्चस्वाच्या वादातून काही तलवार आणि खंजिराने मारहाण झाली. या घटनेत सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहमद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी आपल्या दोन मित्रांसह धुरंधर चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या अर्जितसिंघ चव्हाणवर (२५) यांच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात सय्यद आवेज सय्यद खलील आणि आणखी एका युवक जखमी झाला होता. या दोघांनाही पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

त्याचवेळी अगोदरपासून तेथे उपस्थित असलेल्या मयत अर्जितसिंघ चव्हाणच्या भावाने जखमी सय्यद आवेज सय्यद खलील (२७) आणि मोहंमद अरबाज मोहंमद फारुख (२३) या दोघांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या तिहेरी हत्याकांडामुळे शहरासह नांदेड जिल्हा हादरला. घटनास्थळाहून सर्व पुरावे गोळा करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या दोन्ही गँगमधील अनेक सराईत गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर काही जेलमध्ये आहेत तर काही जामिनीवर बाहेर आले होते. पोलिसांसमोर या गँगवारला आळा घालण्याचे मोठे आव्हान आहे.

चौघांना पकडले,
इतरांचा शोध सुरू
या घटनेतील ४ आरोपींना पकडण्यात आले असून अन्य आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना झाली आहेत, असे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, नांदेडमध्ये गँगवारचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिस वाढती गुन्हेगारी रोखणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

थरारक टोळीयुद्धात
एकमेकांना संपविले
अर्जितसिंघ चव्हाणवर हल्ला झाला, त्यावेळी सोबत संभाजी पाटील व नागेश्वर लडे होते. त्यावेळी साईलालाच्या गँगचे अरबाज व आवेश यांनी तलवार व खंजिराने एकमेकांवर वार करीत अर्जितसिंघला जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी अर्जितसिंघ चव्हाणसोबतच्या संभाजी पाटील व नागेश लड्डे यांनी अरबाज आणि आवेशवर हल्ला चढवला. यात दोघेही जखमी झाले. यात अरबाजचा मृत्यू झाला तर आवेश रुग्णालयात आल्याची माहिती अर्जितच्या भावाला मिळाली आणि त्याने शासकीय रुग्णालयातच आवेशवर खंजिराने वार करत त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. टोळीयुद्धातून या तिघांचा अंत झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR