नागपूर : प्रतिनिधी
मुंबईत काही दिवसांपूर्वी एका तरुण पोलिस कॉन्स्टेबलने नैराश्यातून आणि तणावातून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्ये देखील एका पोलिस कॉन्स्टेबलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराने पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत झोडे (रा. उमरेड) असे पोलिस शिपायाचे नाव आहे. गेले अनेक दिवस झोडे यांचा पत्नीशी नियमित वाद होत होता. सतत होणा-या भांडणातून आणि तणावातून झोडे नैराश्यात होते. या नैराश्यातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. रविवारी घरी कोणीही नसताना पोलिस कॉन्स्टेबल झोडे यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही बाब शेजारी राहणा-या दुस-या पोलिस हवालदाराला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झोडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली घेतली असून पोलिस तपास करीत आहेत.
एका ३२ वर्षीय पोलिस शिपायाने प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून होणा-या मानसिक छळाला कंटाळून आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिपाई मुंबई पोलिस दलात नुकताच भरती झाला होता. त्याच्या प्रेयसीच्या आईने जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू, अशा शब्दांत दिलेल्या धमकीमुळे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

