मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथील तलाठी पेपर फुटी प्रकरणात मूळ पेपर नागपुरातून फोडण्यात आला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्या ठिकाणच्या एका परीक्षा केंद्रावरून पेपर फोडून त्याचे प्रश्न हे छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रावर पाठवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.
राज्यभरात तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान घेण्यात आली. यामध्ये ५ सप्टेंबर रोजी तलाठी भरतीचा पेपर फुटला होता. छत्रपती संभाजीनगर येथील टीसीएस आयओएन केंद्रातील पर्यवेक्षकाने उमेदवारांना उत्तरे पुरविली असल्याचे समोर आले होते. मात्र प्रत्यक्षात याचा सखोल तपास संभाजीनगर पोलिसांनी केल्यानंतर नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून परीक्षा देणा-या उमेदवाराने तलाठीपदाचा पेपर फोडून या पर्यवेक्षकाला प्रश्न पाठवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपूरमधून अजून नक्की किती परीक्षा केंद्रावर पेपर फोडून इतरत्र पाठविण्यात आले होते, असा प्रश्न आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे.
नाशिक येथील परीक्षा केंद्रावर गणेश गुसिंगे या अट्टल पेपरफोड्याने तलाठीचा पेपर फोडला होता. त्याचे चार्जशीट मागील आठवड्यापर्यंत दाखल करण्यात आले नव्हते. म्हणजे या घोटाळ््याच्या मूळापर्यंत कोण होते, ही साखळी नक्की कोणापर्यंत पोचत आहे याबद्दल सर्वसामान्य उमेदवारांना काहीही माहिती नाही.