लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित ‘नाट्यपरिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी लातूर केंद्रावर पार पडली. दि. २४ ऑगस्ट रोजी राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अमोल साळवे लिखित व अनिल कांबळे दिग्दर्शीत ‘ड्रायवर’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत अंतिम फेरी गाठली आहे, असे परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी जाहीर केले.
दि. १५ ते १८ सप्टेंबरदरम्यान मुंबई येथे अंतिम फेरी पार पडणार असून लातूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला होता. मात्र यात सात संघांनी प्रत्यक्ष सादरीकरण केले. नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या वतीने केवळ अंतिम फेरीत जाणा-या एकांकिकेची निवड केली जाणार होती. परंतु लातूर महानगर शाखेच्या वतीने उर्वरित दोन क्रमांक व वैयक्तिक पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे द्वितीय क्रमांक रसबहार संस्थेच्या ‘मैं वारी जावा’ या एकांकिकेस तर तृतीय क्रमांक कलोपासक मंडळ या संस्थेच्या ‘यथार्थ’ या एकांकिकेस मिळाला. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक अनिल कांबळे, द्वितीय अविष्कार गोजमगुंडे तर तृतीय अश्विन देसाई यांना मिळाले. पुरुष अभिनयाचे प्रथम पारितोषिक संदीप घुगरे, द्वितीय रवी आघाव तर तृतीय अशितोष खरवळे यांना तर स्त्री अभिनयाचे प्रथम पारितोषिक रिया गित्ते, द्वितीय क्षितिजा रसाळ तर तृतीय निकिता कोकाटे यांना मिळाले.
अतिशय रंगतदार झालेल्या या स्पर्धेचे परीक्षण तुळजापूरचे प्रा. संभाजी भोसले व सांगलीचे प्रशांत गोखले यांनी केले. या स्पर्धेचे केंद्र प्रमुख म्हणून अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी तर समन्वयक म्हणून प्रा. दीपक वेदपाठक व डॉ. मुकुंद भिसे यांनी काम पाहिले. विजेते संघ व कलाकारांचे बाळकृष्ण धायगुडे, सुरेश गीर, बळवंत देशपांडे, भारत थोरात, विजय मस्के, प्रमोद कांबळे, अजय गोजमगुंडे, सुरेंद्र अपसिंगेकर, उदय गोजमगुंडे, अनिल पुरी व नाट्य परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
















