30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeमहाराष्ट्रनार्वेकरांच्या संपत्तीत १,८६८ टक्के वाढ

नार्वेकरांच्या संपत्तीत १,८६८ टक्के वाढ

६.३ कोटींवरून १२४.४ कोटी

मुंबई : प्रतिनिधी
एखाद्या उमेदवाराच्या संपत्तीत किती वाढ व्हावी, याचा ठोकताळा कुणीही मांडू शकत नाही. मकरंद नार्वेकर यांचेही असेच आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू असलेले मकरंद नार्वेकर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभे आहेत. मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या पत्नी यांची मालमत्ता तब्बल १२४.४ कोटी रुपयांची असून ते मुंबईतील उमेदवारांमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तत्पूर्वी यापूर्वी त्यांनी मालमत्ता किती होती, हे पाहिले तर त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ डोळे विस्फारून टाकणारी आहे. मकरंद नार्वेकर सध्या कुलाब्यातील प्रभाग २२६ मधून निवडणूक लढवत आहेत.

मकरंद नार्वेकर यांनी २०१२ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्याकडे ३.६७ कोटींची संपत्ती होती. २०१७ मध्ये ते निवडणुकीला पुन्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्याकडील मालमत्तेचे मूल्य ६.३ कोटी रुपये होते. आता तिस-यांच्या ते निवडणुकीच्या रिंगणात असून आता त्यांनी मालमत्ता १२४.४ कोटी रुपयांची आहे. निवडणूक आयोगाकडे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे

. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तिघांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक २२६ मधून आणि बहीण गौरवी शिवलकर प्रभाग २२७ मधून निवडणूक लढवत आहेत. शिवाय नार्वेकर यांच्या भावाची पत्नी हर्षिता अश्विन नार्वेकर प्रभाग २२५ मधून उभ्या आहेत.

मकरंद नार्वेकर व्यवसायाने वकील आहेत. प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांची जंगम मालमत्ता ३२ कोटींपेक्षा जास्त आहे. तर स्थावर मालमत्ता ९३.३२ कोटी रुपये आहे. नार्वेकर यांनी २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत जाहीर केलेली मालमत्ता आणि आताची मालमत्ता पाहिली तर तब्बल २० पट म्हणजेच १,८६८ टक्के वाढली आहे. नार्वेकर यांनी अलिबाग परिसरात २७ शेतजमिनी २०२२ ते २०२५ या कालावधीत विकत घेतल्या.

या जमिनी किहीम, झिराडपाडा, सासवणे, मापगाव आणि म्हात्रोळी वाडी या गावांमधील आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या जमिनीचे मूल्य २.४१ कोटी रुपये आहे. शिवाय त्यांच्याकडे दोन टोयोटा फॉर्च्युनर कार असून, त्यांची किंमत अनुक्रमे ४० लाख आणि ३८ लाख रुपये आहे. शिवाय त्यांच्या ताफ्यात एक सिग्मा कार आणि नऊ लाखांची मारुती ग्रँड विटारादेखील आहे. या व्यतिरिक्त २०२१ मध्ये त्यांनी कुलाब्यात घेतलेल्या घराची किंमत ही ८ कोटी रुपये आहे. १२४.४ कोटींची संपत्ती असलेल्या मकरंद नार्वेकरांच्या डोक्यावर १६.६८ कोटींचे बँका आणि वित्तीय संस्थांचे कर्ज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR