नांदेड : प्रतिनिधी
नावघाट पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन कामाजी गंगाधर तिडके (वय ३५, रा. बोंढार हवेली) यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. कामाजी तिडके हे आ. आनंदराव तिडके यांचे चुलत भाऊ असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुलावर सुरक्षा जाळी नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामाजी तिडके यांनी मंगळवारी दुपारी सुमारे ४ वाजता नावघाट पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच इतवारा पोलीस ठाण्याचे जमादार अफजल पठाण यांच्यासह जमादार सरोदे, गोपवाड तसेच कर्मचारी परचुरे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत तत्काळ जीव रक्षकांना पाचारण करून नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली.
जीवरक्षकांनी नदीपात्रात शोध घेतल्यानंतर कामाजी गंगाधर तिडके यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय प्रक्रिया व शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तिडके यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. आपल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर येताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते.या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
















