नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरु केलेली ‘कायद्याचा बालेकिल्ला’ ही मोहीम राज्यभरात चर्चेत आहे. पोलिसांच्या धाकाने एकीकडे अनेक गुन्हेगार बिळात लपून बसले आहेत. तर दुसरीकडे नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून कायदा धाब्यावर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून गांजासह अमली पदार्थांचे सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओत दिसणा-या कैद्यांवर मकोका व खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारागृहात कैद्यांना मोबाईल फोन कसा उपलब्ध झाला व गांजा व तो पिण्याचे साहित्य कारागृहात कसे पोहचले असा प्रश्न उपस्थित होत आहे. आहे. या प्रकारामुळे नाशिक कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले असून कारागृहाच्या सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
यावर कारागृह अधीक्षकांनी मात्र हे व्हिडीओ जुने असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही वर्षांपासून कैद्यांसाठी सकारात्मक उपक्रम राबवले जात आहेत. हे पाहून काही आत्मसंतुष्ट व्यक्तींनी जुन्या क्लिप्स मुद्दाम व्हायरल केल्याचे कारागृह अधीक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान हे फोटो आणि व्हिडीओ नेमके केव्हाचे आहेत. खरोखरच नाशिकरोड कारागृहातीलच आहेत का? याबाबत चौकशी केली जात आहे.

